Join us
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांगांना लॉकडाऊनमध्येही उपलब्ध झाला रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:06 IST

लोकमत न्युज नेटवर्कमुंबई : लॉकडाऊन असल्यामुळे अनेकांचा रोजगार गेला आहे. कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. मात्र, अशा स्थितीतही ...

लोकमत न्युज नेटवर्क

मुंबई : लॉकडाऊन असल्यामुळे अनेकांचा रोजगार गेला आहे. कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. मात्र, अशा स्थितीतही दि नॅशनल असोसिएशन ऑफ डीसेबल एंटरप्राइसेस (नाडे) या संस्थेतर्फे दीडशे अंध, अपंग, मूकबधिर यांना रोजगार मिळाला आहे. या दिव्यांगांनी सुमारे २५ हजार छत्र्या तयार केल्या आहेत. संस्थेच्या विक्रोळीच्या वर्कशॉपमध्ये छत्र्यांची निर्मिती सुरू आहे.

नॅशनल असोसिएशन ऑफ डीसेबल एंटरप्राइसेस गेल्या ३५ वर्षांपासून दिव्यांगांसाठी काम करत आहे. त्यांच्या हाताला रोजगार मिळवून देण्यासाठी विविध उपक्रम या संस्थेच्या माध्यमातून राबवले जातात. गेल्या सात वर्षांपासून छत्री निर्मितीचं काम या संस्थेच्या माध्यमातून केलं जातं. मात्र, मागील वर्षी कोरोनामुळे त्यांच्या छत्रीला मागणी मिळत नव्हती. यामुळे छत्र्यांची विक्री मात्र घटली होती. यंदा पुन्हा संस्थेने काम सुरू केले आहे आणि यावेळी मागणी वाढेल, अशी आशा संस्थेला आहे. कोरोनाचे सर्व नियम पाळून काम सुरू असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले आहे. समाजमाध्यमांचा वापर करून आता संस्थेने छत्री विक्री सुरू केली आहे. दरवर्षी या छत्र्यांची विक्री करण्यासाठी संस्थेतर्फे कंपनी किंवा काही ठिकाणी स्टॉल लावण्यात येतात. यंदा बंदी असल्यामुळे ऑनलाईन विक्री वरती संस्थेने भर दिला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात ही सेवा उपलब्ध असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले आहे.

.................................................

जागा उपलब्ध झाल्यास दहा हजार दिव्यांगांना रोजगार

गेल्या ३५ वर्षांपासून ही संस्था दिव्यांग व्यक्तींसाठी काम करत आहे. सध्या दीडशे दिव्यांगांना रोजगार मिळत आहे. आमच्याकडे संस्थेची स्वतःची हक्काची जागा नाही. राज्य सरकारने आम्हाला जागा उपलब्ध करून दिली, तर आम्ही भविष्यात दहा हजार दिव्यांग व्यक्तींसाठी रोजगार निर्मिती करू शकतो.

विक्रम मोरे, पदाधिकारी, दि नॅशनल असोसिएशन ऑफ डीसेबल एंटरप्राइसेस.

...........................................................................

लॉकडाऊनच्या काळात रोजगाराचा आधार

लॉकडाऊन असल्यामुळे उपासमारीची वेळ आमच्या कुटुंबीयांवर आली. घरातून बाहेर निघू शकत नाही, हाताला काम नाही, करायचं काय अशी वेळ आमच्यावर आली होती. आता काही दिवसांपूर्वी संस्थेचा फोन आला आणि छत्री बनवण्याचे काम असल्याचे सांगण्यात आले. यामुळे रोजगार उपलब्ध झाला. यामुळे खूप आनंद होत असल्याचे या संस्थेत काम करणाऱ्या ज्योती बोराडे यांनी सांगितले.