Join us
Daily Top 2Weekly Top 5

पालिका अधिका-यांना ‘डर्टी ग्रिटिंग्ज’

By admin | Updated: October 22, 2014 03:04 IST

मुंबई शहर आणि उपनगरामध्ये महिलांसाठी पुरेशा मुताऱ्या नाहीत, ज्या ठिकाणी आहेत तिथे योग्य सुविधा मिळत नाहीत.

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरामध्ये महिलांसाठी पुरेशा मुताऱ्या नाहीत, ज्या ठिकाणी आहेत तिथे योग्य सुविधा मिळत नाहीत. यासाठी राइट टू पीचे कार्यकर्ते गेल्या तीन वर्षांपासून प्रयत्न करीत आहेत. मात्र तरीही पालिका प्रशासनाला जाग येत नसल्याने मुताऱ्यांची सद्य:स्थिती दाखवणारी ग्रिटिंग्ज कार्ड भेट म्हणून अधिकाऱ्यांना दिली जाणार आहेत. तीन वर्षांपूर्वीपासून महिलांना मोफत मुताऱ्या असाव्यात, यासाठी आरटीपी कार्यकर्ते झगडत आहेत. आॅगस्ट महिन्यामध्ये महापालिका आयुक्तांना वेळ मिळाल्याने तब्बल अडीच वर्षांनंतर त्यांनी आरटीपी कार्यकर्त्यांची भेट घेतली. यानंतर महापालिका प्रशासनाने महिला मुताऱ्यांचा प्रश्न गंभीरपणे घेतल्याचे चित्र दिसून येत होते. १४ आॅगस्ट रोजी पुन्हा एकदा महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी एक परिपत्रक काढले. यामध्ये या परिपत्रकाची अंमलबजावणी येत्या १५ दिवसांत व्हावी असे नमूद केले होते. मात्र दोन महिने उलटले तरी या परिपत्रकाची अंमलबजावणी झालेली नाही.महिला मुताऱ्यांच्या संदर्भात महापौर, पालिका आयुक्त यांच्याशी आरटीपी कार्यकर्त्यांनी चर्चा केली. त्यांना फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून मुताऱ्यांची स्थिती दाखवण्यात आली. मात्र तरीही काही ठिकाणी परिस्थिती ‘जैसे थे’ अशीच आहे. हे वास्तव अधिकाऱ्यांसमोर यावे म्हणूनच आरटीपी कार्यकर्त्यांनी मिळून अस्वच्छ मुताऱ्या, स्वच्छतागृहांचे फोटो काढले आहेत. त्याची ग्रिटिंग्ज कार्ड्स तयार केली आहेत. बुधवारी दिवाळीच्या पहिल्या दिवशी ही ग्रिटिंग्ज कार्ड्स महापालिका आयुक्त आणि इतर अधिकाऱ्यांना पाठवण्यात येणार असल्याचे आरटीपी कार्यकर्त्या मुमताज शेख यांनी सांगितले. (प्रतिनिधी)