Join us
Daily Top 2Weekly Top 5

खड्ड्यांमुळे वाहनचालक त्रस्त

By admin | Updated: September 1, 2014 04:54 IST

रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांचा प्रश्न गेल्या २ वर्षांपासून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनापर्यंत व्यापारी व वाहतूकदारांनी मांडूनही सुटू शकला नाही.

पनवेल : कळंबोली येथील लोखंड पोलाद बाजाराच्या अंतर्गत रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांचा प्रश्न गेल्या २ वर्षांपासून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनापर्यंत व्यापारी व वाहतूकदारांनी मांडूनही सुटू शकला नाही. येथील रस्त्यांमधील दोन फुटांच्या खड्ड्यांमुळे येथे पावसाळ्यात तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. अशा परिस्थितीमुळे येथील वाहतूकदार व व्यापारी त्रस्त झाले आहेत.लोखंड पोलाद बाजारात १९६० गाळे आहेत. सुरुवातीला हे गाळे लोखंड पोलाद यांचा व्यवसाय करण्यासाठी वितरीत करण्यात आले होते. मात्र कालांतराने हे गाळे वाहतूकदार, गोदाम मालकांनी आणि गॅरेज व्यवसायिकांनी विकत घेतले. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक होत राहिली. लोखंड पोलाद बाजार समितीने येथील गाळेधारकांकडून सेवाकर जमा केला. मात्र येथील पायाभूत सेवा पुरविण्याच्या नावाने येथे कायमस्वरूपी ठणठणाट राहिला. व्यापाऱ्यांनी या समस्येतून सुटका होण्यासाठी गेल्या २ वर्षापूर्वी तत्कालीन पालकमंत्री सुनिल तटकरे यांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेवून आपले गाऱ्हाणे मांडले. अजित पवारांनी सिडको प्रशासनाला फैलावर घेवून येथील रिंगरूट मार्गाचे काँक्रीटीकरण करून घेतले. मात्र बाजारातील अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे तसेच असल्यामुळे येथे तळी तयार झाल्याचा भास होत आहे. येथील काही खड्डे दोन फुट खोल असल्यामुळे हा रस्ता जणू वाहनांचे चाक गिळंकृत करीत असल्याचाच भास वाहनचालकांना होत असतो. त्यामुळे या रस्त्यावरून जाणे चालक टाळतात. अशा परिस्थितीत येथील गाळ्यांमध्ये आगीसारखी एखादी दुर्घटना घडल्यास अग्निशमन दल तसेच पोलिसांनाही तेथे वेळेवर पोहोचणे शक्य होणार नाही. सरकार दरबारी खड्ड्यांसाठी पाठपुरावा करूनही प्रतिसाद मिळत नाही.