Join us  

शिवसेना प्रवेशाचा निर्णय चुकला, 'विकास पॅटर्न'ने सोपलांचा विजय हुकला!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2019 5:42 PM

बार्शीचे माजी आमदार दिलीप सोपल यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत शिवसेना प्रवेश केला.

मयूर गलांडे

मुंबई - बार्शीच्याराजकारणात 35 वर्षे सत्ता गाजवणाऱ्या दिलीप सोपलांचा दुसऱ्यांदा पराभव करत अपक्ष उमेदवार राजेंद्र राऊतांनी तालुक्याच्या राजकारणात 'सरशी' घेतलीय. सोपल यांच्या पराभवाची कारणमीमांसा करताना अनेक मुद्दे विचारात घेतले जात आहेत. मात्र, अचानक झालेला शिवसेना प्रवेशच सोपलांच्या राजकीय करिअरसाठी आत्मघातकी ठरल्याचं निवडणूक निकालानंतर सिद्ध झालंय. तरुणाईच्या आग्रहास्तव आपण शिवसेना प्रवेश केल्याचं सोपल यांनी सांगितलं. पण तालुक्यातील तरुणाईनेच राऊतांना कौल दिलाय. त्यामुळे प्रदीर्घ राजकीय अनुभवाला अनुसरून नसलेला शिवसेना प्रवेशाचा डाव सोपल यांच्या आमदारकीला ब्रेक देणारा ठरला.

बार्शीचे माजी आमदार दिलीप सोपल यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत शिवसेना प्रवेश केला. राज्यात भाजपाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढतच जात आहे. विधानसभा निवडणुकीत राजेंद्र राऊत यांना भाजपाकडून उमेदवारी मिळू नये यासाठी सोपलांनी जंग जंग पछाडलं आणि त्यांचा तो पहिला डाव यशस्वी ठरला. मात्र, दुसऱ्या फेरीत तोच डाव सोपलांवर उलटला. बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी भाजपाशी बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर सोपल यांचे समर्थक निरंजन भूमकर यांनी राष्ट्रवादीतच राहण्याचा निर्णय घेऊन राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळवली. त्यामुळे कार्यकर्त्यांना गृहीत धरणं हे सोपलांच्या शिवसेना प्रवेशाला मारक ठरलं. विशेष म्हणजे राष्ट्रवादीकडून उमेदवारीची ऑफर असतानाही राऊत यांनी आत्मविश्वासाने अपक्ष निवडणूक लढवली आणि जिंकली. यंदाही बार्शीच्या राजकारणात दोघात तिसरा पराभवाला कारणीभूत ठरला. पण यंदा पराभव सोपल यांच्या नशिबी आला.   एम. एस. धोनी अनटोल्ड स्टोरी चित्रपटात धोनी जसं सांगतो, की वर्ल्डकप के लिए 'सिर्फ' तीन साल ही बाकी है... अगदी तसंच प्लॅनिंग राऊत यांनी आमदारकीचं केलं होतं. नगरपालिका निवडणुकांपासून म्हणजेच गेल्या तीन वर्षांपासून विधानसभेला 'फक्त' तीनच वर्षं बाकी असल्याचं मानून त्यांनी आमदारकीच्या अंतिम सामन्याची प्रॅक्टिस सुरू केली होती. या सामन्यातील अत्यंत चुरशीच्या लढतीत राऊतांनी आत्मविश्वासपूर्ण विजय मिळवला. 

शिवसेना प्रवेशाचा निर्णय आत्मघातकीसोपल यांनी युतीच्या सरकारमध्ये शिवसेनेला पाठिंबा देत मंत्रिपद मिळवलं होतं. मात्र, त्यापूर्वीचा आणि त्यानंतरही त्यांचा संपूर्ण राजकीय प्रवास शरद पवारांच्या सान्निध्यात गेलाय. त्यामुळे शिवसेनेचा पिंड नसतानाही सोपल यांनी न पटणारी सेनास्टाईल स्वीकारली. आगामी राज्यातील सत्ताकारणाचे गणित जुळवून शिवसेनेत प्रवेशही केला. मात्र, सत्ताकारणाचं गणित जुळवताना आमदारकीचं गणित बिघडलं. तरुणाईचा आग्रह म्हणून आपण शिवसेनेत प्रवेश केल्याचं सोपल यांनी म्हटलं. पण तरुणाईचा तो आग्रह बालहट्टच होता, हे निवडणूक निकालाने सिद्ध केलंय. कारण सोलापूरमध्ये शिवसेनेच्या मेळाव्यातील सोपल यांचं पहिलंच भाषण हे त्यांच्या खऱ्या शैलीला बाजूला सारणारं होतं. त्यातच सोपल यांनी शिवसेनेवर केलेली टीका, त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. त्यामुळे सोपल समर्थकांची चांगलीच गोची झाली होती. सोपल यांच्यामुळेच राष्ट्रवादी आणि पवारांवर सोपल समर्थकांचं प्रेम जडलं होतं, त्यात पवारांना सोडून जाणाऱ्या नेत्यांची वाढती संख्या पाहून पवारांबद्दल कार्यकर्त्यांमध्ये सहानुभूती निर्माण झाली होती. त्यामुळे बहुतांश कार्यकर्त्यांच्याही मनाला हा निर्णय पटणारा नव्हताच. 

शिवसेनेचं 15 हजारांचं एकगठ्ठा मतदान हा गैरसमजच शिवसेनेचं एकगठ्ठा 15 हजारांचं मतदान आहे, शिवसेनेनं कुणालाही उभं केलं तरी 15 ते 20 हजार कट्टर शिवसैनिकांची मतं मिळतात. त्यात ग्रामीण भाग अधिक आहे, असा गोड गैरसमज तालुक्यात आहे. मात्र गेल्या 2 विधानसभा निवडणुकांच्या निकालातून हे द्योतक खोटं असल्याचं सिद्ध झालंय. कारण विश्वास बारबोले यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवली, त्यावेळी त्यांना जवळपास 18 हजार मतं मिळाली. तर 2014 साली राजेंद्र मिरगणेंनाही 16 हजारांच्या आसपास मतं मिळाली होती. या दोन्ही नेत्यांचं राजकीय वजन, व्याप्ती आणि जनसंपर्क पाहता एवढं मतदान वैयक्तिक म्हणून त्यांना मिळणं अपेक्षित होतं. मग सेनेचं 15 हजार मतदान कुठंय? असा प्रश्न उपस्थित होतो. आता, काळ बदललाय, माध्यमं बदललीय, पिढी बदललीय आणि शिवसेनाही बदललीय. आता बाळासाहेबांची शिवसेना उरली नसल्याने तेवढा कट्टर शिवसैनिकही उरला नाही. त्यामुळे शिवसेनेचं हक्काचं मतदान मिळेल हा भ्रमही यंदाच्या निवडणुकीत खोटा ठरला.      

आर्यन शुगर्सचा मुद्दा केंद्रस्थानीसोपल आणि राऊत यांच्यातील यंदाच्या निवडणुकीत आर्यन शुगर्सचा मुद्दा केंद्रस्थानी होता. राऊत समर्थकांकडून या मुद्द्यावर मोठ्या प्रमाणात भर देण्यात आला. आर्यन शुगर्समधील शेतकऱ्यांचे शेअर्स आणि ऊसबिलाची थकबाकी यांच्यामुळे ग्रामीण भागात सोपल यांना मानणारा वर्गही कमी झाला. सोशल मीडियातूनही यावर मोठ्या प्रमाणात भाष्य झालं. एकीकडे निवडणुकांच्या तोंडावर आर्यन शुगर्स तानाजी सावंत चालवायला घेणार असून, शेतकऱ्यांचे पैसे देतील, असे सांगण्यात आले. तर दुसरीकडे त्यांचेच समर्थक आर्यन शुगर्सचा आणि आमचा संबंध नसल्याचं न्यायालयाच्या निकालाच संदर्भ देत सांगत राहिले. त्यामुळे इंटरनेट आणि डिजिटल युगातील शेतकऱ्यांच्या पोराला ही गोष्ट पटणारी नव्हती. ग्रामीण भागात सोपल यांना कमीच मताधिक्य मिळालं. 

राऊत यांनी विकासकामांवर दिलेला भरराजेंद्र राऊत यांनी बार्शी नगरपालिकेच्या माध्यमातून शहरात मोठ्या प्रमाणात विकासकामं सुरू केली आहेत. त्यामध्ये भुयारी गटार योजना, गाळे, गार्डन, रस्ते, स्ट्रीट लाईट यांचा समावेश आहे. मात्र, नियमित पाणीपुरवठा करण्यात राऊतांना अपयश आलं होतं. त्यामुळे विरोधकांनी पाणीपुरवठा आणि शहरातील उखडलेल्या रस्त्यांचा मुद्दाच केंद्रस्थानी घेऊन प्रचार केला. पण आपण वर्कऑर्डर्स दाखवतो, गावागावात जलयुक्त शिवारचं काम सुरूय, घरकुल आणलेत असे सांगत राऊत यांनी काहीअंशी वैयक्तिक टीकाटिपण्णी सोडल्यास विकासाच्या मुद्द्यावर भर दिला. आगळगाव येथील पहिल्या सभेतूनच राऊत यांनी बार्शी तालुक्याल जलमय, हरित करण्याचा मानस बोलून दाखवला होता. 

रणवीर, रणजितसह सहकारी अन् कार्यकर्त्यांची साथराजेंद्र राऊत यांच्या प्रचाराची धुरा कार्यकर्त्यांनी हाती घेतली होती. त्यामध्ये राऊत यांचे दोन्ही सुपुत्र ताकदीने मैदानात उतरले होते. रणवीर आणि रणजीत यांनी ग्रामीण भागात तळ ठोकल्याचं दिसून आलं. तरुण मित्रांची मोठी फौज या दोन्ही युवा नेत्यांनी उभारली होती. त्याचा फायदा राऊत यांना झाला. यासह, विश्वास बारबोले, रावसाहेब मनगिरे आणि विजय राऊत यांनी शहरात जम बसवला. स्थानिक नेत्यांना आपलंसं करण्यात आणि राऊत गटात सामील करून घेण्यात या नेत्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह वाढल्याने कार्यकर्ताही राऊतांसाठी जोमाने काम करू लागला. मात्र, दुसरीकडे सोपल गटातील कार्यकर्त्यांमध्ये काही प्रमाणात गटबाजी दिसून आली. आर्यन सोपल यांनी तरुणांना एकत्र घेऊन लढा दिला, पण राऊत गटाच्या तुलनेत सोपल यांच्यासाठी पळापळ करणाऱ्या कार्यकर्त्यांचा वेग मंदावल्याचंच दिसून आलं. 

रोड रोडलरची खेळी यशस्वी पण पदरी पराभवचदिलीप सोपल यांना भाजपा नेते राजेंद्र मिरगणे आणि शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर यांचा पाठिंबा मिळाला. त्यात, मिरगणे यांच्या संस्थेत अकाऊंटंट म्हणून काम करणाऱ्या कळसकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, रडीचा डाव म्हणून हा उमेदवारी अर्ज विरोधकांकडून दाखल करण्यात आल्याचं राऊत यांनी सांगितलं. कारण रोड रोलरलाच ट्रॅक्टर समजून हजारोंनी मतदान केलंय. कळसकर यांनी तब्बल 11,427 मतं घेऊन चौथ्या क्रमांकाचं स्थान मिळवलं. बार्शीतील निकालाच्या फेऱ्या सुरू झाल्यानंतर रोडरोलर आणि विशाल कळसकर बार्शीत चर्चेचा विषय ठरला होता. राऊत यांच्या म्हणण्यानुसार सोपल गटाची रोड रोलरची खेळी यशस्वी ठरली, पण पदरी पराभवच आला.

 

टॅग्स :दिलीप सोपलबार्शीविधानसभा निवडणूक 2019राजकारणमुंबई