Join us
Daily Top 2Weekly Top 5

चिपळुणात होणार डिजिटल व्यवस्थापन

By admin | Updated: July 2, 2015 23:28 IST

अभ्यासक्रम घेणारे कोकणातील इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट स्टडीज हे एकमेव महाविद्यालय आहे

अडरे : चिपळूण शहरातील नवकोकण एज्युकेशन सोसायटी संचलित डीबीजे महाविद्यालयात डिजिटल व्यवसाय व्यवस्थापनातील एम. बी. ए. अभ्यासक्रम या वर्षापासून सुरु करण्यात येणार आहे. या अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांना कंपनीत व मार्केटिंग क्षेत्रात रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे, अशी माहिती सोसायटीचे अध्यक्ष सुचय रेडीज यांनी आज (गुरुवारी) पत्रकारांशी बोलताना दिली. यावेळी उपाध्यक्ष बाबू तांबे, संचालक विवेक गिजरे, अविनाश जोशी, राम रेडीज, प्रा. अनघा गोखले, प्रा. सुनील भादुले आदींसह संस्थेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल इंडियाची घोषणा केली असून, १ ते ७ जुलै दरम्यान डिजिटल सप्ताह साजरा करण्याचे आवाहन केले आहे. त्यादृष्टीने नवकोकण सोसायटीने डिजिटल व्यवस्थापन महाविद्यालय काढून पहिले पाऊल उचलले आहे. संपूर्ण भारत इंटरनेटशी जोडणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. सरकारी कार्यालयांचेही डिजिटलायझेशन होणार आहे. येणारा काळ हा डिजिटल बिझनेस मॅनेजमेंटचा आहे. अधिकाधिक भारतीय ग्राहक आॅनलाईन व्यवसायाकडे वळत आहेत. या क्षेत्रात करिअरच्या संधी निर्माण होत आहेत. डिजिटल व्यवस्थापनातील परिपूर्ण ज्ञान देणारा आणि कौशल्य विकसित करण्यावर भर देणारा विद्यापीठ मान्यताप्राप्त एकही अभ्यासक्रम उपलब्ध नव्हता. सरकारचे धोरण लक्षात घेऊन मुंबई विद्यापीठाने डिजिटल व्यवसाय व्यवस्थापनातील एम. बी. ए. या वर्षापासून सुरु केले आहे. या प्रकारचा अभ्यासक्रम घेणारे कोकणातील इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट स्टडीज हे एकमेव महाविद्यालय आहे, असे अध्यक्ष रेडीज यांनी सांगितले. (वार्ताहर)