Join us

डीआयजी मनोजकुमार शर्माही निघाले केंद्रीय सेवेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:06 IST

पाच वर्षांसाठी ‘सीआयएसएफ’मध्ये प्रतिनियुक्ती; ३ महिन्यांत ३ आयपीएसनी सोडले महाराष्ट्रजमीर काझीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ...

पाच वर्षांसाठी ‘सीआयएसएफ’मध्ये प्रतिनियुक्ती; ३ महिन्यांत ३ आयपीएसनी सोडले महाराष्ट्र

जमीर काझी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : स्फोटक कार प्रकरणात पोलिसांचा सहभाग व वरिष्ठ अधिकाऱ्यांचे रुसवेफुगवे समाेर आल्यानंतर आता राज्य सरकारला आणखी एक धक्का बसला आहे. राज्य सुरक्षा महामंडळातील उपमहानिरीक्षक मनोजकुमार शर्मा यांची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात (सीआयएस एफ) पाच वर्षांसाठी नियुक्ती झाली आहे.

महाराष्ट्र पोलीस दलातून केंद्रात प्रतिनियुक्तीवर जाणारे शर्मा हे गेल्या तीन महिन्यांतील तिसरे आयपीएस अधिकारी आहेत. महाविकास आघाडी सरकारकडून सापत्नपणाची वागणूक मिळत असल्याने त्यांनी केंद्राच्या सेवेत जाण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते.

वर्षाच्या सुरुवातीला तत्कालीन पोलीस महासंचालक सुबोध जायसवाल यांनी सीआयएसएफचे प्रमुख म्हणून नियुक्ती झाल्याने ते ७ जानेवारीला पदावरून कार्यमुक्त झाले. त्यानंतर ८ फेब्रुवारीला नागरी संरक्षण विभागाच्या (सिव्हिल डिफेन्स) महासंचालक रश्मी शुक्ला यांची केंद्रात प्रतिनियुक्ती झाली. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) अप्पर महासंचालक म्हणून केंद्रीय गृह विभागाने त्यांची नियुक्ती केल्याने त्यांना तातडीने कार्यमुक्त करण्यात आले. त्यानंतर आता मनोजकुमार शर्मा यांच्या ‘सीआयएसएफ’मध्ये पाच वर्षे प्रतिनियुक्तीचे आदेश केंद्रीय गृह विभागाने काढले आहेत. शर्मा हे गेल्या सात महिन्यांपासून महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात कार्यरत आहेत.

* कोण आहेत मनोजकुमार शर्मा ?

शर्मा हे २००५ च्या आयपीएस बॅचचे अधिकारी असून त्यांनी नागपूर, कोल्हापूर, मुंबईत परिमंडळ-१ येथे समर्थपणे जबाबदारी सांभाळली आहे. पश्चिम विभागाचे अप्पर आयुक्त म्हणून पदोन्नतीवर त्यांची बढती झाली. राज्यात सत्तातरानंतर महाविकास आघाडी सरकारने त्यांची सुरक्षा महामंडळात बदली केली.

* ‘ट‌्वेल्थ फेल’मुळे चर्चेत

प्रामाणिक व संवेदनशील अधिकारी म्हणून ओळखले जाणारे मनोजकुमार शर्मा हे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून केंद्रीय स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांच्या ‘ट‌्वेल्थ फेल’ या संघर्षमय वाटचालीवरील आत्मचरित्रात्मक पुस्तकाने देशभरातील युवकांवर गारुड घातले. ऑनलाईन सर्वाधिक विक्री असलेल्या पुस्तकांत त्याचा समावेश आहे.

.....................