Join us  

दाऊदची जमीन सनातन संस्थेनं खरेदी केली? नवाब मलिकांच्या आरोपावर थेट प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2021 6:00 PM

कोकणातील दाऊदच्या नावाची जागा सनातन संस्थेने घेतल्याचं मलिक म्हणाले. त्यावर आता सनातन संस्थेने सविस्तर खुलासा केला आहे.

मुंबई – ड्रग्स प्रकरणावरुन मंत्री नवाब मलिक(Nawab Malik) यांनी सातत्याने आरोप सुरु केले असताना आता देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी मलिकांचे १९९३ बॉम्बस्फोटातील आरोपींसोबत आर्थिक व्यवहार झाल्याची माहिती उघड केली. मुंबईत मोक्याच्या ठिकाणची जागा मलिकांनी कवडीमोल दरात विकत घेतली. ९३ बॉम्बस्फोटातील आरोपींसोबत हा व्यवहार झाल्याचे पुरावे फडणवीसांनी माध्यमांसमोर आणले. त्यानंतर मलिकांनी फडणवीसांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना सनातन संस्थेचा उल्लेख केला.

कोकणातील दाऊदच्या नावाची जागा सनातन संस्थेने घेतल्याचं मलिक म्हणाले. त्यावर आता सनातन संस्थेने सविस्तर खुलासा केला आहे. सनातन संस्थेने म्हटलं आहे की, मुंबईतील ड्रग्ज प्रकरणात अत्यंत हीन पातळीचे राजकारण चालू आहे. त्यातच आज नवाब मलिक यांनी स्वतःवर झालेल्या आरोपांच्या खुलाशासाठी सत्य जाणून न घेताच सनातन संस्थेच्या नावाचा विनाकारण वापर केला आहे. दाऊदची कोणतीही मालमत्ता सनातन संस्थेने खरेदी केलेली नसून प्रत्यक्षात रत्नागिरीतील वर्तमानपत्रांत प्रसिद्ध झालेल्या बातम्यांनुसार ती मालमत्ता दिल्लीतील अ‍ॅड. अजय श्रीवास्तव यांनी खरेदी केली आहे. त्या ठिकाणी लहान मुलांवर संस्कार करण्यासाठी ‘सनातन धर्म पाठशाळा’ नावाने गुरुकुल चालू करण्याचे त्यांनी घोषित केले आहे. सनातन संस्था आणि अ‍ॅड्. अजय श्रीवास्तव यांचा कोणताही संबंध नाही असं त्यांनी सांगितले.

तसेच पुरेशी माहिती न घेताच सनातन संस्थेसंदर्भात अशा प्रकारचे खोटे आरोप करून नवाब मलिक यांनी स्वतःचे हसे करू नये. सनातन संस्था आणि दाऊद यांची एकत्रित चर्चा करून समाजात हिंदु संस्थांविषयी अपसमज पसरवण्याची ही दुष्ट बुद्धी आहे. या प्रकरणी नवाब मलिक यांना महाराष्ट्र सरकारने समज द्यावी अशी मागणी सनातन संस्थेने केली आहे. मलिक यांनी सनातन संस्थेचे नाव घेऊन महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांना बगल देण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्यक्षात त्यांच्यावर आतंकवादाच्या गुन्हेगारांकडून थेट जमीन घेतल्याचा आरोप झाला आहे, तर नवाब मलिक ज्या दाऊदच्या जमिनीचा उल्लेख करत आहेत, ती जमीन केंद्र सरकारने जप्त करून लिलाव केलेली आहे. त्यामुळे अ‍ॅड्. श्रीवास्तव यांनीही ती दाऊदकडून घेतलेली नसून सरकारी लिलावाच्या माध्यमातून खरेदी केलेली आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्यायला हवे असं सनातन संस्थेने सांगितले.

दरम्यान, असत्य माहितीच्या आधारे स्वतःची लंगडी बाजू सावरण्याचा त्यांचा प्रयत्न उघडा पडला आहे. या संदर्भात सनातन संस्थेविषयी असत्य माहिती पसरवण्याचा प्रयत्न झाल्यास त्याविषयी नाईलाजाने आम्हाला कायदेशीर कारवाई करावी लागेल, असा इशाराही सनातन संस्थेने मंत्री नवाब मलिकांना दिला आहे.

टॅग्स :नवाब मलिकसनातन संस्थादेवेंद्र फडणवीस