Join us
Daily Top 2Weekly Top 5

33 वर्षांनंतर झाला शब्देवीण संवाद...; मायलेकीची हृद्य भेट, स्पर्शातूनच कळले भाव अंतरीचे

By मनीषा म्हात्रे | Updated: January 1, 2024 11:25 IST

या अबोल भेटीतून केवळ स्पर्शातूनच या हृदयीच्या अंतरीचे भाव त्या हृदयी पोहोचले. आईला भेटून ती कृतकृत्य झाली...

मुंबई : कुमारी माता म्हणून समाजात कोणी हिणवू नये म्हणून आईने तिला जन्मत:च नागपुरातील एका संस्थेकडे सोपविले. तेथून त्या अनाथ मुलीचा प्रवास मुंबई आणि पुढे नेदरलँडपर्यंत झाला. ३३ वर्षांनी या मायलेकींची भेट एका अज्ञातस्थळी झाली. या अबोल भेटीतून केवळ स्पर्शातूनच या हृदयीच्या अंतरीचे भाव त्या हृदयी पोहोचले. आईला भेटून ती कृतकृत्य झाली...

युरोपातील नेदरलँडमध्ये ती सुखासीन आयुष्य जगत होती. मात्र, आपली आई कोणीतरी वेगळीच आहे. कुठे असेल ती, कशी असेल ती, हे प्रश्न तिला सतत सतवायचे. त्यातूनच मग या तरुणीने आईचा शोध घेण्याचे ठरविले. १९९० मध्ये जन्मत:च आईने तिला दूर केले. नागपुरातील एका संस्थेने तिची रवानगी मुंबईला केली. नेदरलँडमधील एका दाम्पत्याने तिला दत्तक घेतले. लाडाकोडात वाढवून मोठे केले. उच्च शिक्षण घेऊन समाजसेवेत ती कार्यरत झाली. मात्र, आपल्या मुळाची आठवण तिला सतत खुणावत होती. २०१७ मध्ये तिचा संपर्क नेदरलँडस्थित अगेन्स्ट चाइल्ड ट्रॅफिकिंग ऑर्गनायझेशन कौन्सिलच्या अरुण डोल यांच्याशी झाला. त्यांनी तिला मदतीचा हात पुढे केला. पुण्यातील ॲडॉप्टी राइट्स कौन्सिलच्या संचालिका ॲड. अंजली पवार यांच्याशी अरुण डोल यांनी संपर्क साधला. संबंधित संस्थेकडे पाठपुरावा सुरू झाला. सुदैवाने तरुणीच्या आईचे नाव आणि पत्ता मिळाला. आईचे लग्न झाले होते आणि ती विदर्भात राहते, इतपत माहिती मिळाली. 

  संपर्क आणि भेट   - आई आणि मुलीची भेट तर घडवून आणायची, मात्र त्याबद्दल गुप्तता पाळायची असे दुहेरी आव्हान होते. अखेरीस आईशी संपर्क साधला गेला. कुमारी असताना झालेली मुलगी आता मोठी झाली असून, तिला आपल्याला भेटायचे आहे, यावर त्या मातेचा विश्वासच बसत नव्हता. विनंतीनंतर मातेने डीएनए चाचणी देण्याची तयारी दर्शविली. डीएनए जुळल्यानंतर मायलेकींची भेट एका मंदिरात ठरली.- नेदरलँडहून आलेल्या त्या तरुणीला हुरहूर लागून राहिली होती. अखेरीस तो क्षण आला. तब्बल ३३ वर्षांनी आईची भेट झाली आणि तुटलेली मायेची नाळ पुन्हा एकदा जुळली. नऊवारी साडी, डोईवर पदर, कपाळावर कुंकू, हातात हिरवा चुडा अशा रूपात आई समोर आली. - तरुणीचा अश्रूचा बांध फुटला. ती नकळत आईच्या कुशीत विसावली. ताटातुटीनंतरच्या जवळपास तीन तपानंतर भेटलेल्या मायलेकीला परस्परांची भाषा कळत नव्हती. मायेच्या स्पर्शातून सर्व संवाद झाला. दोघींच्या भेटीने आम्ही भारावून गेलो, असे ॲड. अंजली पवार म्हणाल्या. अरुण डोल आणि अंजली पवार यांच्या प्रयत्नातून आतापर्यंत असे महाराष्ट्रातून परदेशात दत्तक म्हणून गेलेल्या ८० जणांची दुरावलेली नाळ पुन्हा जुळली आहे.

टॅग्स :मुंबई