Join us

राज्यातील पाच जिल्ह्यांत ६५ टक्के नव्या काेराेना रुग्णांचे निदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:05 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती आणि ठाणे या प्रमुख पाच जिल्ह्यांत काेराेनाचे नवे रुग्ण ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती आणि ठाणे या प्रमुख पाच जिल्ह्यांत काेराेनाचे नवे रुग्ण आढळण्याचे प्रमाण ६५ टक्के आहे. मुंबईतील रुग्ण दुपटीच्या कालावधीत घट झाली आहे. १५ फेब्रुवारी रोजी ताे ४५५ दिवस होता, तर २१ फेब्रुवारी रोजी ३७१ दिवसांवर आल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात राष्ट्रीय पातळीवरील तुलना करता मुंबईत कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग दिसून येत होता. सध्या मुंबईत २२ फेब्रुवारीपर्यंत एकूण ३ लाख १९ हजार ८८८ कोरोनाबाधित असून बळींचा आकडा ११ हजार ४४६ आहे. उपचाराधीन रुग्णांची संख्या ७ हजार ३९७ आहे.

राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती आणि ठाणे या पाच जिल्ह्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. काही अंशी यवतमाळ आणि अकोल्यातही रुग्ण वाढत असल्याचे दिसून येत आहे.

आरोग्य विभागाचे सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले की, राज्यातील वाढता संसर्ग ही दुसरी लाट नाही. सर्वसामान्यांच्या शिथिलतेमुळे रुग्ण वाढत आहेत. पुन्हा एकदा राज्य शासनाच्या वतीने नियमांमध्ये कठोरता आणण्यात येत आहे.

विदर्भात मागील पाच दिवसांत दोन हजारांहून अधिक नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. या ठिकाणी मृत्युदर २.४१ टक्के आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१.९ टक्के इतके आहे. विदर्भातील स्थानिक प्रशासन संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी कडक नियमांची अंमलबजावणी करीत आहे. सर्वसामान्यांनीही सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्कचा वापर, सॅनिटायजर व स्वच्छता, शारीरिक अंतर राखणे हे नियम कठाेरपणे पाळायला हवेत, अशी माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनचे सदस्य डॉ. पार्थिव संघवी यांनी दिली.

.............................