Join us
Daily Top 2Weekly Top 5

मधुमेही रुग्णांचीही आता अ‍ॅपद्वारे नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 01:14 IST

वर्धेत प्रायोगिक तत्त्वावर उपक्रम सुरू; नऊ जिल्ह्यांत करणार वापर

मुंबई : उच्च रक्तदाबाच्या रुग्णांवरील उपचार व पाठपुराव्यासाठी चार जिल्ह्यांत प्रायोगिक तत्त्वावर वापरले जोणारे सिम्पल अ‍ॅप आता दुसऱ्या टप्प्यात नऊ जिल्ह्यांत वापरण्यात येईल. या अ‍ॅपच्या माध्यमातून उच्च रक्तदाबाबरोबरच आता मधुमेही रुग्णांचीही नोंद ठेवण्यात येईल. त्यासंदर्भातला पथदर्शी प्रकल्प वर्धा जिल्ह्यात सुरू आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात सध्या भंडारा, वर्धा, सिंधुदुर्ग आणि सातारा या चार जिल्ह्यांमधील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर या अ‍ॅपचा वापर सुरू असून रुग्णांची नोंदणी त्याद्वारे केली जात आहे. बदलत्या जीवनशैलीशी निगडित उच्च रक्तदाबाच्या आजारावर नियंत्रणासाठी इंडिया हायपरटेन्शन कंट्रोल इनिशिएटिव्ह (आयएचसीआय) यांच्या मदतीने हे अ‍ॅप तयार केले आहे.

राज्यातील गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, पुणे, रत्नागिरी, ठाणे, पालघर, कोल्हापूर आणि सांगली या नऊ जिल्ह्यांमध्ये दुसºया टप्प्यात सिम्पल अ‍ॅपचा वापर प्राथमिक आरोग्य केंद्रांत केला जाईल. सध्या या जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी, एएनएम, औषध निर्माता यांना यासंदर्भात प्रशिक्षण दिले जात आहे.उच्च रक्तदाब नियंत्रणाबरोबरच धोकादायक रुग्णांचे निदान करून त्यांच्यावर पुढील उपचार करणे, तसेच उच्च रक्तदाबामुळे निर्माण होणाºया हृदयविकार, पक्षाघाताच्या आजारावर मात करण्यासाठी हा उपक्रम यशस्वी ठरेल, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

चार जिल्ह्यांत लाखांहून अधिक रुग्णदेशात महाराष्ट्रासह अन्य पाच राज्यांमध्ये या अ‍ॅपचा वापर सुरू असून आतापर्यंत भंडारा, वर्धा, सिंधुदुर्ग, सातारा या चार जिल्ह्यांत एक लाख २७ हजार ८८२ रुग्णांची नोंदणी करण्यात आली आहे.अ‍ॅपची वैशिष्ट्ये : रुग्णांची नोंदणी ते त्यांचा पुढील ३० दिवसांचा पाठपुरावा अ‍ॅपच्या माध्यमातून करण्यात येतो. या अ‍ॅपमध्ये नोंदणी केलेल्या रुग्णांची रक्तदाबाची तपासणी, उपचार तसेच त्यांना संपूर्ण महिनाभराच्या गोळ्या मोफत दिल्या जातात. या अ‍ॅपमुळे रक्तदाबाच्या रुग्णांचा पाठपुरावा करणे सोपे झाले आहे. उपचार सुरू करून ३० दिवस पूर्ण होताच पुढील पाठपुराव्यासाठी रुग्णाला मोबाइलवर एसएमएस पाठविला जातो. एखादा रुग्ण ३० दिवसांनंतरही उपचाराला न आल्यास त्याची यादी केली जाते. ती संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्राच्या स्टाफ नर्सकडे जाते. त्यानुसार नर्स त्या रुग्णाला संपर्क करते. तरीही प्रतिसाद न मिळाल्यास ती यादी एएनएम, आशा यांना दिली जाते. आशा वर्कर संबंधित रुग्णाच्या घरी भेट देऊन उपचारांबाबत पाठपुरावा करते.