Join us

थर्टीफर्स्टच्या तयारीची धूम

By admin | Updated: December 27, 2014 01:05 IST

अवघ्या काही दिवसांवर आलेल्या २०१५ च्या स्वागतासाठी मुंबईकरांचे जोरदार प्लानिंग सुरू झाले आहे.

मुंबई : अवघ्या काही दिवसांवर आलेल्या २०१५ च्या स्वागतासाठी मुंबईकरांचे जोरदार प्लानिंग सुरू झाले आहे. थर्टीफर्स्टला धूम ठोकण्यासाठी समुद्रकिनारे, हॉटेल्स, रेस्टॉरंटसह गल्लोगल्लीपासून गच्चीपर्यंत तयारी सुरू झाली आहे़ गुलाबी थंडीत नेमका कशाचा आस्वाद घेत नववर्षात पदार्पण करायचे याचीही जुळवाजुळव सुरू झाली आहे़या तयारीत पार्टीसाठी जागेची शोधाशोध तर डीजे लावण्यासाठी वर्गणी काढण्यासाठी चाळीतील व सोसायटीतील धडाधडीच्या कार्यकर्त्यांची धावपळ सुरू झाली आहे़ व्यस्त कामातून आवर्जुन वेळ काढून जुन्या वर्षाचा बाहूला बनवणे, वर्गणीसाठी सर्व मित्रांना भेटणे ही कामे चालु झाली आहेत़ मुली व महिला देखील या कामात उत्साहाने हातभार लावत आहेत़ गृहिणीही आपल्या मुलांना पार्टीसाठी नवीन कपडे घेण्याची तयारी करत आहेत़ ज्येष्ठ नागरिकही यात मागे न राहता त्यांच्यापरीने नववर्षाच्या पार्टीची तयार करत आहेत़ शाळा व महाविद्यालयीन मुला व मुलींसाठी तर थर्टी फस्ट म्हणजे पार्टीचे एक निमित्तच असल्याने मित्रमैत्रिणींच्या वेळेची जुळवाजुळव सुरू आहे़ काही मुंबईकरांना रात्री सफर आवडते़ त्यामुळे काहींनी थर्टी फर्स्टची रात्र मुंबईत फिरायचे प्लानिंग केले आहे, त्यासाठी खास शाळेतल्या मित्रांचा ग्रूप संपूर्ण रात्र बुलेट राईडही करणार आहेत. (प्रतिनिधी)