मुंबई : होळी आणि रंगपंचमीसाठी मुंबई पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. त्यामुळे टवाळखोरांवर पोलिसांचे विशेष लक्ष असणार आहे. धार्मिक भावना दुखावतील अशा ठिकाणी रंग, रंगाचे पाणी, रंगाच्या पाण्याने भरलेले फुगे मारणे तसेच अपशब्द वापरणे, घोषणाबाजी करणे यावर पोलिसांनी बंदी घातली आहे. १२ मार्चपासून १७ मार्चपर्यंत ही बंदी घालण्यात आली आहे. होळीच्या सणात कुठल्याही प्रकारे अनुचित प्रकार घडू नयेत म्हणून पोलिसांनी ही भूमिका घेतली आहे. भांगेमध्ये अमलीपदार्थांचाही वापर करण्यात येण्याच्या शक्यतेतून पोलिसांच्या अमलीपदार्थविरोधी विभागाने ड्रग्ज तस्कर आणि विक्रेत्यांवर करडी नजर ठेवली आहे. तसेच होळी आणि धुळवडीनिमित्त मुलींची छेड काढणे, फुगे मारणे तसेच धार्मिक भावना दुखावून सामाजिक तेढ निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी काही गोष्टींवर बंदी घातली आहे. त्यात अपशब्द वापरणे, घोषवाक्ये किंवा आक्षेपार्ह गाणी म्हणण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागेल असे आक्षेपार्ह हातवारे करणे, टोळीचे प्रतिनिधित्व करणे, चित्र काढून ती प्रदर्शित करण्यावरसुद्धा बंदी करण्यात आली असल्याचे पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांनी सांगितले आहे. शनिवारी मध्यरात्रीपासून शहरात हे आदेश लागू करण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)
धुळवडीला पोलिसांचे सुरक्षा कवच
By admin | Updated: March 11, 2017 03:03 IST