Join us
Daily Top 2Weekly Top 5

धर्माचे आचरणही विवेकी पद्धतीने व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : धर्म मग तो कोणताही असो, त्याचे आचरण विवेकी पद्धतीने करणे याची आज गरज ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : धर्म मग तो कोणताही असो, त्याचे आचरण विवेकी पद्धतीने करणे याची आज गरज आहे, असे मत ख्रिश्चन धर्माचे तरुण अभ्यासक डॅनियल मास्करनीस यांनी शनिवारी एका ऑनलाइन व्याख्यानात मांडले. ख्रिस्ती धर्मातील अंधश्रद्धांकडे प्रतीकात्मक तसेच विवेकी दृष्टिकोनातून पाहायला हवे, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रशिक्षण केंद्राने आयोजित केलेल्या ‘ख्रिश्चन धर्मातील अंधश्रद्धा, त्यांचे निर्मूलन आणि विवेक’ या विषयावरीस व्याख्यानात मास्करनीस यांनी, ख्रिस्ती धर्मातील वेगवेगळ्या मतप्रवाहांबद्दल विवेचन केले. ख्रिस्ती धर्मामध्ये जुना करार तसेच नवा करार असे दोन गट आहेत. प्रामुख्याने जुन्या करारामध्ये पृथ्वीची उत्पत्ती तसेच मानवाच्या उत्पत्ती संदर्भामध्ये अनेक संज्ञा स्पष्ट केल्या आहेत. त्या सर्व चमत्कारांना विवेकाच्या तसेच विज्ञानाच्या दृष्टिकोनातून पाहणे आवश्यक असल्याचे मास्करनीस यांनी म्हटले.

येशूंनी विवेकाचा जागर ख्रिस्ती धर्मात आणला. येशूंनी जुन्या चालीरीती खोडून काढल्या. सगळीकडेच अंधश्रद्धेचे स्तोम मोठ्या प्रमाणात वाढते आहे. मात्र अनेक विचारवंतांनी या अंधश्रद्धांची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला. लिओ टॉल्स्टॉय तसेच मार्टिन ल्युथर किंग यांनी कॅथलिक चर्चमधील अंधश्रद्धांवर बोट ठेवले आणि लोकांना विवेकवादी होण्याचा दृष्टिकोन दिला आहे, असा दाखलाही मास्करनीस यांनी दिला. विवेकी विचारांचा प्रचार तसेच प्रसार करणाऱ्यांना समाजात पाठिंबा मिळतोच असे नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. या व्याख्यानास अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते वरिष्ठ ॲडव्होकेट अतुल अल्मेडा, विवेक मंचाचे फ्रान्सिस अल्मेडा उपस्थित होते.