Join us  

धारावी नियंत्रणात ; मात्र आता हायप्रोफाईल परिसरात कोरोनाचा धोका !

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2020 10:51 PM

शहर उपनगरात कुलाबा ए विभाग आणि वांद्रे, खार, सांताक्रुझ पश्चिम एच पश्चिम विभागांमध्ये  कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे दिसून आले आहे.

मुंबई – चार महिन्यानंतर मुंबईमधील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ५४ दिवसांवर पोहोचला आहे. तर रुग्ण वाढीचा वेग देखील १.७२ टक्क्यांवरून १.३० टक्क्यांवर आला आहे. आशियातील सर्वांत मोठी झोपडपट्टी मानल्या जाणाऱ्या धारावीतही कोरोना नियंत्रणात आला आहे. मात्र आता हायप्रोफाईल परिसरात कोरोना परसत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. वांद्रे, सांताक्रुझ पूर्व, एच पूर्व प्रभागात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी १५३ दिवसाचा आहे.a

शहर उपनगरात कुलाबा ए विभाग आणि वांद्रे, खार, सांताक्रुझ पश्चिम एच पश्चिम विभागांमध्ये  कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे दिसून आले आहे. या दोन विभागांतील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी घटला असून वाढीच्या दर वाढला आहे. ए विभागात १३ जुलै रोजी कोरोनाचे रुग्ण ६२ दिवसात दुप्पट होत होते.  १७ जुलै पर्यंत हा कालावधी ४३ दिवसांपर्यंत आला आहे. तर एच पश्चिम मध्ये हा कालावधी ४६ दिवसांवरुन ४३ दिवसांवर आला असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे.

बोरीवली आर मध्य या एकमेव विभागात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी २८ दिवसांवर स्थिर असल्याचे दिसून आले आहे. ए विभागांत १३ जुलै पर्यंत २ हजार ९८ रुग्ण आढळले होते. तर, १७ जून रोजी २ हजार २४६ रुग्ण नोंदविण्यात आले आहेत. १३ जुलै रोजी कोरोनाच्या रुग्णवाढीत या प्रभागाचा क्रमांक १७ होता आता पाचवर आला आहे. एच पश्चिम प्रभागात १३ जुलैपर्यंत  २ हजार ३९३ रुग्ण आढळले होते. तर १७ जुलैपर्यंत २ हजार ५४७ रुग्ण आढळले आहेत. या प्रभागाचा क्रमांक आठवरुन सहाव्या क्रमांकावर घसरला आहे.

केवळ बोरिवली प्रभागातील दर दोन टक्क्यांपेक्षा जास्त २.५ टक्क्यांवर स्थिर आहे. ए विभागातील रुग्ण वाढीचा दर १.१ टक्क्यांवरुन १.६ टक्क्यांवर, तर एच पश्चिम प्रभागातील दर १.५ टक्क्यांवरुन १.६ टक्क्यांवर आला आहे. मुलुंड टी, ग्रॅन्ट रोड, कांदिवली आर दक्षिण आणि आर उत्तर दहिसर या प्रभागातील रुग्णवाढीचा दर पूर्वी दोन टक्क्यांपेक्षा जास्त होता. आता मुलुंड २ टक्के, ग्रँटरोड २ टक्के,कांदिवली १.९ आणि दहिसर १.६ टक्क्यांवर आला आहे.

चौकट

रुग्ण दुपटीचा दर

विभाग       १३ जुलै            १७ जुलै

एम पश्चिम   ४६          ४३

आर मध्य     २८          २८

टी          २९          ३५

आर दक्षिण   ३४          ३७

एच पश्चिम   ४६          ४३

डी           ३४          ३६

ए           ६२          ४३

देशाच्या तुलनेत मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक

शहर उपनगरात ७० टक्के रुग्णांनी कोरोनावर मात केली असून हा दर देशाच्या आणि राज्याच्या सरासरी दरापेक्षा जास्त आहे. त्यामुळे, बरे होण्यात मुंबई आघाडीवर आहे. तर, दिल्लीतील कोरोनामुक्तीचा दर मुंबईपेक्षा जास्त आहे. कोरोनामुक्तीचा दर ५५ टक्के असून देशातील रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ५२ टक्के आहे. त्यामुळे, महाराष्ट्र आणि देशाच्या तुलनेत मुंबईचा रिकव्हरी रेट खूप जास्त आहे. जूनच्या मध्यापर्यंत मुंबईतील ५० टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले होते. त्यानंतर, पालिकेने ‘मिशन झिरो’ ही मोहीम हाती घेतली आणि रुग्णसंख्या कमी करण्यावर भर दिला. त्यानंतर १ जुलैला ५७ टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर १५ जुलैपर्यंत ७० टक्के रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामुंबईधारावी