मुंबई : धारावीत आरोपी बंधूना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या अंगावरच आरोपींनी गाडी घालण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली. या धडकेत एक पोलीस जखमी झाला असून, त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. धारावीत सराईत गुन्हेगार असलेले अफसर आझाद आणि अख्तर आझाद या दोघांविरुद्ध विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत, तर अख्तरला धारावी परिसरातून तडीपार करण्यात आले होते. असे असताना अख्तर धारावीतील रोहिदास मार्गावर फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, धारावी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अनिल गायकवाड आणि चेतन बागुल यांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा आरोपी बंधूनी स्कोडा गाडीतून पळ काढण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, या दुकलीने गाडी समोर उभ्या असलेल्या बागुल आणि गायकवाड यांच्या अंगावर गाडी चढविण्याचा प्रयत्न केला. बागुल तत्काळ रस्त्याकडेला झाल्याने त्यांना जास्त मार बसला नाही. मात्र, गायकवाड जखमी झाले आहे. दरम्यान, नाकाबंदी करत यातील दोघा बंधूना अटक करण्यात आली. याचा अधिक तपास सुरू असल्याची माहिती धारावी पोलीस ठाण्याचे वरीष्ठ निरीक्षक सूर्यकांत बांगर यांनी दिली. (प्रतिनिधी)
धारावीत पोलिसांवर हल्ला
By admin | Updated: June 20, 2016 03:52 IST