Join us
Daily Top 2Weekly Top 5

धारावीत अंधश्रद्धेतून जाणारा बळी वाचला

By admin | Updated: May 19, 2015 00:29 IST

अंधश्रद्धेतून भुताने झपाटले असल्याचे सांगून रखरखत्या उन्हात एका तरुणाला साखळीने झाडाला बांधून ठेवण्यात आल्याची घटना धारावीत सोमवारी घडली.

मुंबई : अंधश्रद्धेतून भुताने झपाटले असल्याचे सांगून रखरखत्या उन्हात एका तरुणाला साखळीने झाडाला बांधून ठेवण्यात आल्याची घटना धारावीत सोमवारी घडली. याची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत तरुणाची सुटका करत मंदिराच्या ढोंगी मांत्रिकासह त्याच्या साथीदाराला ताब्यात घेतले आहे. सुरेश रामाकुंजी कुर्वे (५०) असे आरोपी ढोंगी बाबाचे नाव आहे.धारावी ९० फिट रोड येथे धार्मिक स्थळाजवळ कुर्वे बाबा भूत व प्रेत उतरविण्याच्या नावाखाली नागरिकांना गंडा घालत होता. त्याच परिसरात राहणाऱ्या गणेश कोरवे (२२) या तरुणाची प्रकृती स्थिर नसल्याने त्याच्या कुटुंबीयांनी त्याला या बाबाकडे आणले होते. मुलाला भुताने झपाटले असल्याचे सांगून गेल्या चार दिवसांपासून तो या मुलाला झाडूने मारहाण करून त्याच्यावर उदी फुंकत होता. सोमवारी भूत उतरविण्याच्या नावाखाली गणेशला रखरखत्या उन्हात लोखंडी साखळीने झाडाला बांधून ठेवण्यात आले होते. गेल्या चार दिवसांपासून उपाशीपोटी तरुणावर सुरू असलेल्या भोंदूबाबाच्या अत्याचारामुळे गणेशची प्रकृती जास्तच खालावत असल्याचे स्थानिकांच्या लक्षात आले. त्यांनी धारावी पोलिसांना याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी तरुणाची सुटका करत बाबाच्या मुसक्या आवळल्या.