Join us  

Corona vaccine : धाकधूक, भीती अन् आनंद; वांद्रे-कुर्ला संकुलातील केंद्रासह केईएम, नायर, जे. जे., कूपरमध्ये सकारात्मक वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2021 2:20 AM

कोरोना विषाणूला हद्दपार करण्यासाठी दाखल झालेल्या कोविशिल्ड लसीचा पहिला डोस वैद्यकीय कर्मचाऱ्यांना देण्यास शनिवारपासून सुरुवात झाली. विलेपार्ले येथील कूपर रुग्णालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लसीकरणाला ऑनलाईन सुरुवात केली.

मुंबई : कोरोनाच्या तीव्र संक्रमणकाळात रुग्णालयातील भयाण शांतता, चिंतेत असलेले चेहरे आणि रुग्णाच्या काळजीने अहोरात्र ताटकळत बसलेले कुटुंब या स्थितीनंतर शनिवारी वांद्रे-कुर्ला संकुलातील केंद्रासह केईएम, नायर, कूपर रुग्णाय अशा विविध केंद्रांवर लसीकरणास प्रारंभ झाला. सुरुवातीला धाकधूक, भीती आणि लसीकरणानंतर आनंद असे वातावरण सर्वच केंद्रांवर पहायला मिळाले.कोरोना विषाणूला हद्दपार करण्यासाठी दाखल झालेल्या कोविशिल्ड लसीचा पहिला डोस वैद्यकीय कर्मचाऱ्यांना देण्यास शनिवारपासून सुरुवात झाली. विलेपार्ले येथील कूपर रुग्णालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लसीकरणाला ऑनलाईन सुरुवात केली. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वांद्रे-कुर्ला संकुलातील केंद्रात लसीकरणाला प्रारंभ झाला. लसीकरणासाठी पाचशे प्रशिक्षित पथके पालिकेने तैनात ठेवली आहेत. दररोज ५० हजार लोकांना लस देण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे.कूपर रुग्णालयात माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांना पहिली लस देण्यात आली तर वांद्रे-कुर्ला संकुलातील केंद्रात डॉ. मधुरा पाटील आणि डॉ. मनोज पाचंगे यांना लस देण्यात आली. टाळ्यांच्या गजरात कोरोना योद्ध्यांच्या लसीकरणाचा शुभारंभ झाला. मुंबईतील नऊ केंद्रात दोन सत्रांत चार हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्याचे नियोजन केले होते. यासाठी शनिवारी पहिल्याच दिवशी टोकन मिळालेल्या डॉक्टर, परिचारिका व आरोग्य कर्मचाऱ्यांनी नियोजित केंद्राबाहेर रांग लावली होती. लसीबाबत अद्याप काही ठिकाणी संभ्रम व्यक्त केला जात असला, तरी या ऐतिहासिक क्षणी पहिल्या यादीत आपले नाव आल्याचा अभिमान आरोग्य कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर झळकत होता. पहिला डोस घेतल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांना कोणताही त्रास होताे का? याचे निरीक्षण करण्यासाठी त्यांना प्रतीक्षा कक्षात बसविण्यात येत होते. मात्र, अर्ध्या तासानंतर लस घेणारे निश्चिंत होऊन केंद्राबाहेर पडत होते.मुंबईत एकाचवेळी एक कोटी दोन लाख लस साठवणुकीची क्षमता आहे. कांजूरमार्ग, परळ यासोबतच अन्य सहा ठिकाणी साठवूणक क्षमता असून, दररोज ५० हजार लोकांना लस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात एक लाख ३० हजार आरोग्य कर्मचार्‍यांना लस देण्यात येणार आहे. यानंतर टप्पा दोनमध्ये फ्रंटलाईन वर्कर्सना लस देण्यात येईल. केंद्र आणि राज्य सरकारच्या निर्देशानुसार लसींच्या उपलब्धतेनुसार पुढेही मोहीम राबविण्यात येणार असल्याचे पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी सांगितले.कोणताही दुष्परिणाम नाही -जगभरात कोविड लसीकरण सुरू झाले असून, अमेरिकेत एक कोटी १० लाख, इंग्लंडमध्ये ३४ लाख जणांना लसीकरण करण्यात आले आहे. जगभरात लसीकरण करण्यामध्ये आपला देश ५० व्या क्रमांकावर आहे. मुंबई-महाराष्ट्रात हजारो लोकांचे ट्रायल घेतले आहे. यामध्ये एकाही व्यक्तीला त्रास झाल्याचे उदाहरण नाही. त्यामुळे लसीकरणाला घाबरण्याचे कोणतेही कारण नसल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले.तिसऱ्यांदा प्रतिसाद न दिल्यास बाद -कोविन ॲपवर नावाची नोंदणी झाल्यानंतर संबंधित व्यक्तीला लस घेण्याची वेळ, ठिकाण आणि तारीख एसएमएस करण्यात येईल. त्यानंतर दिलेल्या वेळेत हजर न राहणाऱ्या व्यक्तीशी एकूण तीनवेळा संपर्क साधण्याचा प्रयत्न पालिका करणार आहे. मात्र, तीन फोन, तीन संदेश पाठवूनही प्रतिसाद न देणारा लाभार्थी या प्रक्रियेतून बाद होणार असल्याचे पालिकेतील सुत्रांनी सांगितले.

टॅग्स :कोरोनाची लसकोरोना सकारात्मक बातम्याकोरोना वायरस बातम्याऔषधं