Join us
Daily Top 2Weekly Top 5

भक्तिरसाला उधाण

By admin | Updated: August 29, 2014 01:02 IST

श्री गणेशाच्या आगमनात न्हाऊन निघालेल्या मुंबापुरीतल्या गणेशभक्तांच्या भक्तिरसाला उधाण आले आहे

मुंबई : श्री गणेशाच्या आगमनात न्हाऊन निघालेल्या मुंबापुरीतल्या गणेशभक्तांच्या भक्तिरसाला उधाण आले आहे. ज्या श्री गणेशाची मुंबईकर आतुरतेने वाट पाहत होते, असा वक्रतुंड भक्तांच्या घरांची वाट चालू लागला असून, बाप्पाच्या स्वागतासाठी नटलेली मुंबापुरी मोदकाच्या चवीसह फुलपाकळ्यांच्या सुगंधाने दरवळून निघाली आहे.अवघ्या महाराष्ट्राला वेड लावणारा गणेशोत्सव पुणे, नागपूरपेक्षाही मुंबापुरीत मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यासाठी मुंबईकर कार्यकर्त्यांसह भक्तांनी कंबर कसली आहे. विशेषत: दक्षिण मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे देखावे, मिरवणुका आणि दहा दिवस गाजणाऱ्या कार्यक्रमांची रेलचेल असे भरगच्च वेळापत्रक असणाऱ्या मुंबईतल्या गणेशोत्सवाला भक्तिरसामुळे आनंदाची झालर लागली आहे. मुंबई शहर आणि उपनगरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना महापालिकेतर्फे ठोठाविण्यात येणारा दंड; यासारख्या मुद्द्यांना बगल देत सूर्याच्या पहिल्या किरणापासून सूर्य डोक्यावर येईपर्यंत लाडक्या बाप्पाचे शुक्रवारी मुंबईकरांच्या घराघरात आगमन होणार आहे.तत्पूर्वी लालबागसह दादर आणि पश्चिम आणि पूर्व उपनगरातील बाजारपेठाही गणेशाच्या आगमनासाठी फुलल्या आहेत. दादर येथील फुलमार्केट, लालबाग येथील मार्केट आणि उपनगरातील स्थानकांलगतचा परिसर असे सर्व काही श्री गणेशाच्या भक्तिरसात तल्लीन झाले आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे देखावेही आता पूर्णाकृतीमध्ये उतरले असून, घराघरातल्या देखाव्यांमध्येही स्पर्धांमुळे चुरस लागली आहे. ध्वनी, जल आणि वायुप्रदूषण अशा सर्व गोष्टींना देखाव्यांत स्थान देण्यात मंडळे अग्रस्थानी असून, घरगुती गणेशाच्या सजावटीतही या मुद्द्यांना प्राधान्याने सादर करण्यात आले आहे.विशेषत: सराफांच्या दुकानांत लाडक्या बाप्पासाठी मोदक आणि दागिन्यांच्या खरेदीसाठी भक्तांची झुंबड उडाली आहे. फुले आणि फळांच्या किमतीने तर गगनाचा भाव गाठला असला तरीदेखील केवळ गणेशावरील भक्तीमुळे वस्तूंचे भाव हेही आता दुय्यम मुद्दे ठरू लागले आहेत. महत्त्वाचे म्हणजे बाप्पाचे मोदकही ३०० रुपयांपासून ५ हजार या किलोदराने विकले जात असून, उर्वरित मिठाईच्या पदार्थांचीही मागणी वाढू लागली आहे. आणि एकंदरीतच पुढील दहा दिवस मुंबापुरीतला उत्साह ओसंडून वाहणार असून, भक्तिरसाची लाट उत्साह शिगेला पोहोचविणार आहे. (प्रतिनिधी)