Join us  

निरोप घेतो बाप्पा, आम्हा आज्ञा असावी; जड अंत:करणाने गणरायाला निरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2019 1:05 AM

देशभरात अकरा दिवसांच्या बाप्पांचे विसर्जन

मुंबई : ढोल-ताशे, डीजे व बेन्जोच्या तालावर नाचत मोठ्या उत्साहात अकरा दिवसांच्या घरगुती व सार्वजनिक गणपतींचे गुरुवारी जड अंत:करणाने आणि पुढच्या वर्षी लवकर येण्याचे आमंत्रण देऊन विसर्जन करण्यात आले.

गुरुवारी सकाळपासून लालबागचा राजा, गणेशगल्लीचा बाप्पा, चिंचपोकळीचा चिंतामणी, तेजुकायाचा गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात झाली. तसेच शहर उपनगरांतील रस्ते ट्रक, टेम्पो, रिक्षा, कारमध्ये बसून निघालेल्या बाप्पांनी व निरोपाला निघालेल्या लोकांनी गजबजलेले होते. विसर्जनात कोणत्याही प्रकारचे विघ्न येऊ नये म्हणून, सकाळपासूनच पोलिसांनी रस्त्यांवर ठिकठिकाणी चोख बंदोबस्त ठेवत कोणताही गैरप्रकार होणार नाही, याची काळजी घेतलेली होती. विसर्जनाला येणाऱ्या लोकांसाठी पार्किंग व्यवस्था आणि वाहतूक सुरळीत राहावी यासाठी वाहतूक विभागाने पुरेपूर खबरदारी घेतली होती. 

बघता बघता १0 दिवस कसे निघून गेले याची खबर कुणाला लागली नाही. गेले दहा दिवस आपल्या लाडक्या बाप्पाची मनोभावाने सेवा केल्यानंतर गणेशभक्तांनी आज आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’चा जयघोष करत गणरायाला निरोप देण्यात आला. राज्यभरात गणेश विसर्जन मिरवणुकीला सकाळपासून सुरुवात झाली. मुंबईत मोठे गणपती आणि पुण्यात पाचही मानाच्या गणपतींची विसर्जन मिरवणूक मोठ्या थाटात निघाली.पुढच्या वर्षी लवकरच येणार...पुढच्या वर्षी आपला लाडका बाप्पा ११ दिवस लवकर येणार असल्याचे पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले. याविषयी अधिक माहिती देताना सोमण म्हणाले की, पुढच्या वर्षी श्रीगणेश चतुर्थी शनिवार, दि. २२ ऑगस्ट रोजी येणार आहे. गणेश उपासकांसाठी त्यापुढील पाच वर्षांच्या श्रीगणेश चतुर्थीच्या तारखाही सोमण यांनी दिल्या. शुक्रवार १० सप्टेंबर २०२१, बुधवार ३१ ऑगस्ट २०२२, मंगळवार १९ सप्टेंबर २०२३, शनिवार ७ सप्टेंबर २०२४, बुधवार २७ आॅगस्ट २०२५ रोजी श्रीगणेश चतुर्थी येणार आहे.

टॅग्स :गणेश विसर्जनगणेशोत्सव