Join us  

फडणवीसांमुळे 'ठाकरे'चा आजार बरा; ऊर्जा अन् प्रेरणा देणारा प्रसंग उलगडला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 11:45 PM

रायगड जिल्ह्यातील कर्जतच्या वेदांत ठाकरे या १३ वर्षीय मुलाला गंभीर आजाराने ग्रासले होते.

मुंबई - राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस हेच जेवढे आक्रमक तेवढेच हळवे आणि संवेदनशील असल्याचेही अनेक प्रसंगातून समोर आले आहे. अनेकदा राजकीय बेरीज-वजाबाकी करताना त्यांच्यातील धुरंदर राजकारणी दिसून येतो. विरोधकांवर तुटून पडणाऱ्या आक्रमक नेत्याचही दर्शन घडतं. तर, प्रसंगी गरीब शेतकऱ्यांची जमिन लुबाडणाऱ्या सावकाराकडून त्यांची जमिन परत मिळवून देणारे संवेदनशील उपमुख्यमंत्रीही पाहायला मिळतात. भाजपा कार्यकर्त्यांसह सर्वसामान्यांच्या अडचणींतही कधी-कधी थेट त्यांचा सहभाग दिसतो. असाच एक प्रसंग देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आहे. ज्यामध्ये, फडणवीसांमुळे ठाकरेचा आजार बरा झाला. 

रायगड जिल्ह्यातील कर्जतच्या वेदांत ठाकरे या १३ वर्षीय मुलाला गंभीर आजाराने ग्रासले होते. या मुलाच्या पालकांनी भाजपा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर, फडणवीसांच्या कार्यालयातून ठाकरे कुटुंबीयांना सर्वोतोपरी मदत झाली अन् वेदांत ठाकरेवर मुंबईतील रुग्णालयात उपचार पार पडले. याबाबत स्वत: फडणवीसांनी ट्विटरवरुन माहिती दिली आहे.

''परिस्थितीवर मात करून, खचून न जाता लढणारे फार कमी असतात. त्यापैकीच एक म्हणजे कर्जतचा (रायगड) १३ वर्षाचा वेदांत ठाकरे. काही महिन्यांपूर्वी वेदांतच्या पालकांनी एका भाजप कार्यकर्त्यामार्फत मला संपर्क केला. थॅलेसेमियामुळे वेदांतवर उद्भवलेली कठीण व गंभीर परिस्थिती त्यांनी मांडली. माझ्या कार्यालयाने प्रयत्न केले. वेदांतवर मुंबईत उपचार सुरु झाला. या आजाराचा उपचार म्हणजे जणू एक कठीण परीक्षाच ! पण वेदांत हिमतीने पुढे गेला. आज थॅलेसेमिया सारख्या गंभीर आजारावर मात केलेल्या वेदांतने कुटुंबासमवेत माझ्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली,'' असा प्रसंग देवेंद्र फडणवीसांनी उलगडला. वेंदात ठाकरेंना बरं करण्यात फडणवीसांनी मोलाची भूमिका निभावली. 

''वेदांत आणि त्याच्या कुटुंबियांच्या या खडतर प्रवासात मी त्यांची साथ देऊ शकलो, याबद्दल मी स्वतः ला भाग्यवान समजतो. आज वेदांतला बरा होऊन, त्याला प्रफुल्लित पाहून आनंद झाला. लोकसेवा आणि जनकल्याणाच्या क्षेत्रात असेच काही क्षण अधिक परिश्रम करण्यास ऊर्जा, प्रेरणा देऊन जातात,'' असे यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. 

दरम्यान, फडणवीसांनी ट्विटरवरुन सांगितलेल्या आणि उलगडलेल्या या प्रसंगातून वेंदात ठाकरे बरा झाल्याचा आनंद त्याच्या कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत आहे.  

टॅग्स :मुंबईदेवेंद्र फडणवीसहॉस्पिटलकर्जत