Join us

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विकासकामांना आला वेग

By admin | Updated: February 14, 2015 01:37 IST

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील विकासकामांना वेग आला आहे. स्थायी समितीने एकाच दिवशी ८७ कोटी ९१ लाख रूपयांच्या प्रस्तावास मंजुरी दिली आहे

नवी मुंबई : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील विकासकामांना वेग आला आहे. स्थायी समितीने एकाच दिवशी ८७ कोटी ९१ लाख रूपयांच्या प्रस्तावास मंजुरी दिली आहे. वाशी व कोपरखैरणेतील अग्निशमन केंद्र बांधण्याचा प्रश्नही मार्गी लागला असून तलाव, मार्केट व इतर अनेक कामांचा यामध्ये समावेश आहे. नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये वर्षअखेरीस व निवडणुकीची चाहूल लागली की विकासकामे वेगाने होत असतात. लोकसभा निवडणुकीच्या अगोदर १५ दिवसांमध्ये तब्बल साडेसहाशे कोटी रूपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली होती. महानगरपालिकेच्या निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या असल्यामुळे पुन्हा एकदा वेगाने विकासकामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. शुक्रवारच्या स्थायी समिती बैठकीमध्ये तब्बल ३० प्रस्ताव मंजुरीसाठी मांडण्यात आले होते. ८७ कोटी ९१ लाख रूपयांचे ठराव मंजूर झाले आहेत. वाशीमधील अग्निशमन केंद्राची इमारत धोकादायक बनली आहे. सदर इमारतीच्या जागेवर अग्निशमन केंद्र व वाणिज्य संकुलाची इमारत उभारण्यात येणार आहे. ५६ कोटी ७० लाख रूपये खर्च करून नवीन वास्तू उभारण्यात येणार आहे. यामध्ये अग्निशमन कर्मचाऱ्यांसाठी ३१ सदनिकाही बांधण्यात येणार आहेत. कोपरखैरणेमध्ये नवीन अग्निशमन केंद्र बांधण्यात येणार आहे. यासाठी ७ कोटी २५ लाख रूपये खर्च होणार आहेत. एमआयडीसीतील महापे तलावाची सुधारणा करण्याची मागणी अनेक वर्र्षांपासून लोकप्रतिनिधी करत होते. सदर तलावाचे सुशोभीकरण केले जाणार असून त्यासाठी २ कोटी १५ लाख रूपये खर्च करण्यात येणार आहेत. बेलापूर सेक्टर १ ए मधील भूखंडावर दैनंदिन बाजाराची इमारत बांधण्यात येणार आहे. शहरातील दिवाबत्तीच्या देखभाल दुरूस्तीच्या कामांनाही मंजुरी देण्यात आली आहे. समाजकल्याण व झोपडपट्टी सुधार समितीअंतर्गत मागासवर्गीय घटकामधील विद्यार्थ्यांना दुचाकींचे वितरण करण्यात येणार आहे. २५०० विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे. स्थायी समितीच्या येणाऱ्या बैठकांमध्येही मोठ्याप्रमाणात विकासकामांचे प्रस्ताव मंजूर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. (प्रतिनिधी)