Join us

खालापूरचा विकास खोळंबला

By admin | Updated: December 27, 2014 22:19 IST

कारखानदारी यामुळे खालापूर तालुक्याचा विकास होणे गरजेचे असताना अजूनही हा तालुका विकासापासून कोसो दूर आहे.

खालापूर : मुंबई आणि पुणे या दोन शहरांचे मध्यवर्ती ठिकाण, दु्रतगती आणि राष्ट्रीय महामार्ग, मोठ्या प्रमाणात असलेली कारखानदारी यामुळे खालापूर तालुक्याचा विकास होणे गरजेचे असताना अजूनही हा तालुका विकासापासून कोसो दूर आहे. लोकांना हव्या असलेल्या मुलभूत सुविधाही अद्याप सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचलेल्या दिसत नाहीत. त्यामुळे आर्थिक राजाधानीच्या जवळ असूनही खालापूर तालुका विकासाच्या बाबतीत मात्र मागासलेलाच राहिला आहे. विकासाचा हा अनुषेष भरुन काढण्याची गरज निर्माण झाली असून लोकप्रतिनिधींनी यासाठी पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे.खालापूर हा रायगड जिल्ह्यातील महत्वाचा तालुका आहे दिवंगत माजी मुख्यमंत्री अ. र. अंतुले यांनी रसायनी येथे एच.ओ.सी. हा कारखाना आणला. त्यानंतर धीरुभाई अंबानी यांचा रिलायन्स, ओर्के आणि अन्य मोठे कारखाने या भागात उभे राहिले. त्यामुळे या भागाचा झपाट्याने विकास होईल, असे चित्र निर्माण झाले होते. मुंबईच्या जवळ दळणवळणासाठी सोयीचा तसेच जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट यामुळे खालापूर तालुक्यात अल्पावधीतच कारखान्यांचे जाळे उभे राहिले. त्यामुळे खालापूर तालुक्याची ओळख सर्वात अधिक कारखाने असलेला तालुका अशी झाली.कारखानदारी वाढू लागल्यानंतर अनेकांनी आपली शेती कारखान्यांसाठी दिली. शेतीतील अल्प उत्पन्न व अन्य कारणांमुळे शेतीकडे दुर्लक्ष होत असल्याने कारखान्याला शेती दिली. तर घरातील कोणाला तरी नोकरी मिळेल व त्यातून कुटुंबाची गुजराण होईल, असा या मागचा हेतू होता. कारखानदारीने काही प्रमाणात सुबत्ता आली असली रोजगाराबरोबर पुरक रोजगार स्थानिकांत मिळाला असला तरी आजही खालापूर तालुका मुलभूत सुविधांपासूनही वंचित आहे. रस्ते, पाणी या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी स्थानिकांना झगडावे लागत आहे. मोठ्या प्रमाणात कारखानदारी असली तरी तालुक्यातील सर्व रस्त्यांची चाळण झाली आहे.पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर आहे. आजही अनेक वाड्या व वस्त्यांवर पाणी टंचाई असल्याने महिलांना पाण्यासाठी करावी लागणारी वणवण तालुक्यातील विकास कामांबाबत लोकप्रतिनिधींची उदासिनता दाखवणारी आहे. तालुक्यातील जनतेच्या आरोग्याचा प्रश्नही मोठा आहे. तालुक्यात एकही मोठे रुग्णालय नाही. येथून दोन मोठे महामार्ग गेले असून कारखाने असल्याने नेहमी अपघात होत असतात. अशावेळी सर्व सोयींनी युक्त रुग्णालय यनसल्याने अनेकदा जखमी किंवा आजारी असलेल्या रुग्णांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. या व अशा अनेक समस्या आवासुन समोर असताना तालुक्याच्या विकासासाठी आजवर करण्यात आलेले प्रयत्न तोकडे असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे राजकारण बाजूला ठेवून खासदार श्रीरंग बारणे व आमदार सुरेश लाड यांनी तालुक्याच्या विकासासाठी पुढाकार घेण्याची गरज असल्याची मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत. (वार्ताहर)कचऱ्याची समस्याखालापूर तालुक्याच्या सर्वच भागांत औद्योगिकीकरणाचे जाळे पसरले असून, दरडोई उत्पन्नात वाढ झाली आहे. विकास होत असला तरी स्थानिक सोयी-सुविधा अपुऱ्या पडत आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या राजकरणाचा फटका जनतेला बसत आहे. खड्डेमय रस्ते, कचऱ्याच्या समस्येमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, याबाबत ठोस उपाययोजना आवश्यक आहेत. कारखानदारी वाढली तरी विविध महत्त्वाचे प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत. नव्या सरकारकडून जनतेला मोठ्या अपेक्षा असून, तालुक्याच्या विकासासाठी प्रशासन अणि लोकप्रतिनिधींनी एकत्र येणे आवश्यक आहे.- अभिषेक दर्गे, मनसे उपाध्यक्ष