गेली अनेक वर्षे दहिसर व मीरा-भाईंदर यामधील हद्द निश्चित नाही.
मुंबई महानगरपालिका व मीरा-भाईंदर महानगरपालिका यांमध्ये भौतिकदृष्ट्या हद्द नसल्यामुळे मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय शहराची सुरक्षितता धोक्यात आली आहे. तसेच तिथे असलेल्या खारफुटीची संरक्षण आणि संवर्धन करणे हेही अतिशय महत्त्वाचे आहे.
या संदर्भात दहिसर व मीरा-भाईंदरची हद्द निश्चित करा, येथील खारफुटीचे संवर्धन करा, अशी मागणी पालिकेच्या प्रभाग क्रमांक ७च्या शिवसेना नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यावरण मंत्री व उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांना पत्राद्वारे विनंती केली होती.
यानंतर आज मुख्यमंत्र्यांच्या तसेच पर्यावरण मंत्र्यांच्या आदेशाने विभाग क्रमांक १चे विभागप्रमुख व आमदार विलास पोतनीस यांच्या सहमान्यवरांनी या सर्व परिसराची पाहणी केली. या वेळी सीमा प्रश्न आणि त्यासोबत येथील खारफुटीचे संवर्धन या विषयांवर चर्चा करण्यात आली, अशी माहिती शीतल म्हात्रे यांनी ‘लोकमत’ला दिली.
या प्रसंगी संतोष लोहकरे (मंडळ अधिकारी गोरेगाव (प्रभारी) बोरीवली), कांदळवन विभागाच्या वनसंरक्षण अधिकारी वैशाली गवळी, नगर भूमापन अधिकारी (बोरीवली विभाग) गीते तसेच शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
--------------------------------