Join us

तोतया पोलीस अधिकारी गजाआड

By admin | Updated: July 31, 2015 03:10 IST

सहकाऱ्याकडील कर्जाऊ रक्कम वसुल करण्यासाठी तोतया पोलीस अधिकाऱ्यांचा आधार घेतल्याची धक्कादायक बाब भांडुपमधील टॅ्रव्हल एजंटच्या लूटप्रकरणी अटक करण्यात आलेल्या

मुंबई: सहकाऱ्याकडील कर्जाऊ रक्कम वसुल करण्यासाठी तोतया पोलीस अधिकाऱ्यांचा आधार घेतल्याची धक्कादायक बाब भांडुपमधील टॅ्रव्हल एजंटच्या लूटप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या चौकशीतून समोर आली. मुख्य सूत्रधार शशिभूषण सिंग, अमित नार्वेकर, प्रभाकर सत्रपाका आणि तेजस धोंडे अशी अटक केलेल्या चौकडीची नावे आहेत.भांडुप जमील नगर परिसरात राहणाऱ्या रामकैलास रामसुरत राम या ट्रॅव्हल्स एजंटचे २६ जुलै रोजी सिंगने त्याच्या तिघा मित्रासह गुन्हे शाखेचे अधिकारी असल्याची बतावणी करुन राहत्या घरातून अपहरण केले. ऐरोली परिसरात रामकैलास यांना गाडीतून उतरवून बेदम मारहाण केली. त्यांच्याकडील दागिने आणि रोकड असा एकूण ४१ हजारांचा ऐवज घेऊन त्यांनी पळ काढल्याने राम यांनी भांडुप पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी सिंगसह चौघांविरोधात जबरी चोरीप्रकरणी गुन्हा दाखल केला. भांडुप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक श्रीपाद काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय नितीने गिजे यांच्या तपास पथकाने आरोपीचा शोध घेत ही चौकडी उल्हासनगर परिसरात राहत असल्याची माहिती मिळताच बुधवारी आणि गुरुवारी या ठिकाणी सापळे रचून चौकडीला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिंग हा राम यांचा सहकारी असून त्याचा ठाणे परिसरात शिप मॅनेजमेंटचा व्यवसाय आहे. सिंगकडे दिलेले ३ लाख घेण्यावरुन दोघांमध्ये वाद सुरु होता. अनेकदा विनवणी करुनही सिंग पैसे देत नसल्याने सिंगने पैसे उकळण्यासाठी त्याच परिसरात राहणाऱ्या मित्र नार्वेकर, धोंडे आणि सत्रपाका यांना गुन्हे शाखेचे अधिकारी बनून राम यांच्या घरी धाड टाकून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला. (प्रतिनिधी)