Join us

महागाईचे सावट तरीही उत्सवात मात्र हात सैल; सजावटीच्या साहित्यात ३० टक्क्यांनी वाढ

By रतींद्र नाईक | Updated: September 15, 2023 13:01 IST

गणेशोत्सव तोंडावर आला असून, बाप्पाच्या सजावटीसाठी मुंबईकरांची लगबग सुरू झाली आहे. बाप्पाची आरास, डेकोरेशन काय करायचे हे ठरले आहे.

मुंबई :

गणेशोत्सव तोंडावर आला असून, बाप्पाच्या सजावटीसाठी मुंबईकरांची लगबग सुरू झाली आहे. बाप्पाची आरास, डेकोरेशन काय करायचे हे ठरले आहे. असे असले तरी गणेशोत्सवावर यंदा महागाईचे सावट पाहायला मिळत आहे. मखर सजावटीच्या साहित्यात २५ ते ३० टक्क्यांपर्यंत वाढ झाली असून, गणपतीच्या मूर्तीही ५०० ते ८०० रुपयांनी महागल्या आहेत. असे असले तरी बाप्पाचा उत्सव दणक्यात साजरा करण्यासाठी जोरदार खरेदी केली जात आहे.

माळ, सजावटीचे साहित्य, कंठीहार, तोरण, रंगीबेरंगी मखर, कलाकुसरीच्या वस्तू यांच्या दरात ४० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. प्लास्टीक बंदी, थर्माकोलवर निर्बंध यामुळे सजावटीचे साहित्य महाग झाले असून, मखर व त्यासाठी काम करणाऱ्या कारागिरांच्या मजुरीत वाढ झाल्याने हे दर वाढल्याचे दुकानदार अजय दरेकर यांनी सांगितले.

फुले, तोरणे, मखर प्लास्टीकची फुले, तोरणे गेल्या वर्षी १५० ते ३५० या दरात मिळत असत, मात्र आता हे दर २०० ते ४०० रुपयांच्या घरात पोहोचले आहेत. थर्माकोलचे मखर १५०० रुपयांपासून ७ ते ८ हजारांपर्यंत बाजारात मिळत आहेत. 

मूर्तीही महागल्या २ फुटांची बैठी मूर्ती साडेचार ते ५ हजारापर्यंत मिळते, तर शाडूच्या मातीची मूर्ती ५ ते ६ हजारात मिळते, अशी माहिती मूर्तिकार अवनी राजे यांनी दिली. रंगकाम, कारागिरांची मजुरीने मूर्तीचे दर वाढले आहेत. 

उत्सव दणक्यातगणेशोत्सव वर्षातून एकदाच येत असून बाप्पाच्या आगमनामुळे सर्वत्र चैतन्य पसरते. मूर्ती असो की सजावटीचे साहित्य असो, खरेदीत हात आखडता घेऊन चालत नाही, असे म्हणत मुंबईकर बाप्पाच्या आगमनात कोणतीही कसूर न ठेवता दणक्यात खरेदी करत आहेत.

टॅग्स :मुंबई