Join us

गॅस सिलिंडरसाठी वणवण

By admin | Updated: January 22, 2015 01:07 IST

भायखळ्यातील भारत गॅसच्या एजन्सीचे कर्मचारी गॅस सिलिंडरच्या अनुदान प्रक्रियेच्या कार्यवाहीत व्यस्त असल्याने ग्राहकांना स्वत:च सिलिंडर ने-आण करण्यासाठी हमाली करावी लागत आहे.

मुंबई : भायखळ्यातील भारत गॅसच्या एजन्सीचे कर्मचारी गॅस सिलिंडरच्या अनुदान प्रक्रियेच्या कार्यवाहीत व्यस्त असल्याने ग्राहकांना स्वत:च सिलिंडर ने-आण करण्यासाठी हमाली करावी लागत आहे. परिणामी ग्राहकांना गॅस सिलिंडर मिळवण्यासाठी चांगलीच दमछाक करावी लागत आहे.भायखळा पूर्वेकडे भारत गॅसची एजन्सी नवजीवन गॅस सप्लाय कंपनीला देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून एजन्सीच्या कार्यालयाबाहेर सिलिंडर मिळवण्यासाठी ग्राहकांची रीघ दिसत आहे. दोन ते तीन दिवस ग्राहक भरलेला सिलिंडर मिळवण्यासाठी चकरा मारत असल्याचे काही ग्राहकांनी सांगितले.याबाबत एजन्सीशी संपर्क साधला असता, सरकारने गॅस सिलिंडरवर देण्यात येणाऱ्या अनुदानाची कार्यालयीन प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिल्याने कर्मचाऱ्यांची कमतरता भासत असल्याचे सांगण्यात आले.दरम्यान, ग्राहकांनी रिकामा सिलिंडर आणि गॅस सिलिंडर घेतल्याची जुनी पावती दाखवली तरी भरलेल्या गॅस सिलिंडरचे वाटप करण्यात येत आहे. त्यामुळे एखाद्या ग्राहकाची हरवलेली जुनी पावती दाखवून कोणीही व्यक्ती घातपात करण्यासाठी भरलेला सिलिंडर घेऊन जाण्याची शक्यता बळावते.रिकामा सिलिंडर एजन्सीच्या कार्यालयापर्यंत आणण्यासाठी ग्राहक सायकल, दुचाकी किंवा टॅक्सीचा आधार घेत आहेत. मात्र टॅक्सीमधून रिकामा किंवा भरलेला गॅस सिलिंडर घेऊन जाणे नियमबाह्य असतानाही सर्रासपणे नियमांचे उल्लंघन करण्यात येत आहे. परिणामी स्थानिक वाहतूक आणि पोलीस प्रशासन कारवाई करणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. (प्रतिनिधी)