Join us  

उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी राज्यपाल सी.व्ही.राव यांची घेतली सदिच्छा भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 8:41 PM

रोजगार हमी योजनेअंतर्गत रोजगारांना तात्काळ मदत कामे आणि कामाचे मानधन तात्काळ उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा करण्यात आली.

मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाच्या विधानपरिषद उपसभापती म्हणून ६० वर्षानंतर महिला ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांची नियुक्ती झाली आहे. ना.डॉ.गोऱ्हे यांची निवड झाल्या नंतर आज राज्यपाल सी.व्ही.राव यांची भेट घेऊन कामाचा आढावा दिला. या भेटीत ना.डॉ.गोऱ्हे यांनी मनरेगा बाबतच्या घेतलेल्या बैठकीची माहिती दिली. यात रोजगार हमी योजनेअंतर्गत रोजगारांना तात्काळ मदत कामे आणि कामाचे मानधन तात्काळ उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा करण्यात आली. तसेचवन विभागात रोजगार हमी योजनेअंतर्गत कामे मिळण्यासाठी मजुरांना अडचणी येत आहेत. याबाबत ना.डॉ.गोऱ्हे यांनी राज्यपाल श्री राव यांचे लक्ष वेधले. यावर राज्यपाल श्री राव यांनी रोजगार हमी विभाग, वन विभाग आणि आदिवासी विभाग यांची बैठक लवकरच आयोजित करण्याचे आदेश दिले आहेत

शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांतील शेतकऱ्यांच्या विधवा पत्नीला मुलांच्या शिक्षणासाठी किंवा  शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी सोयीचे  व्हावे, यासाठी जिल्ह्यातील नोंदणीकृत असलेल्या पात्र सर्व  विधवा पत्नीला प्रमाणपत्र देण्यात यावे, अशा सूचना शासनाला केल्याचे ना.डॉ.गोऱ्हे यांनी राज्यपाल यांना अवगत करून दिले. या महसूल मंत्री ना.चंद्रकांत पाटील यांच्या सोबत सदर विषयावर घेण्यात आलेल्या बैठकीत ना.पाटील यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी महिलांना अधिकार व पुनर्वसनासाठी मदत निधीची तरतूद करणार असल्याचे हे या बैठकीचे फलित आहे असे नम्रता पूर्वक ना.डॉ.गोऱ्हे यांनी नमूद केले.ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी बीड जिल्हयातील ऊसतोड कामगार महिलांचे गर्भाशय काढून टाकण्यात आलेल्या घटनेची माहिती देताना आरोग्य विभागाच्या मदतीने याबाबत दक्षता घेण्यासाठी ना.डॉ.गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या कामाची माहिती दिली. ना.डॉ.गोऱ्हे दि.१६ आणि १७ जुलै रोजी बीड जिल्ह्यातील अधिकारी, पीडित महिला आणि स्वयंसेवी संस्था यांची भेट घेणार आहेत. महिलांमध्ये गर्भाशय काढून टाकण्याचे प्रमाण आंध्रप्रदेश, तामिळनाडू आणि तेलंगणा येथे वाढत असल्याचे देखील राज्यपाल श्री राव यांनी यावेळी सांगितले. तसेच मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये महिलांवर होणारे हल्ले आणि अत्याचार याबाबत देखील बैठक घेऊन रेल्वे, पोलीस प्रशासन यांनी यातील आरोपींना तात्काळ अटक करण्याबाबत निर्देश दिले आहेत असे राज्यपाल श्री राव यांना अवगत केले.  

टॅग्स :नीलम गो-हेमुंबई