अनिकेत घमंडी, डोंबिवलीशहराच्या मुख्य भागांमध्ये विशेषत: पूर्वेकडील भागातील प्रमुख रस्त्यांवर गेल्या वर्षभरापासून सिमेंट काँक्रीटीकरणाची कामे सुरु आहेत. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या वाहन संख्येमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न आधीच जटील असतांना या कामासाठी होणा-या खोदकामांमुळे त्या अडचणीत वाढ नको, यासाठी ठाणे उप आयुक्त शहर वाहतूक विभागाने वर्षभरापूर्वीच खासगी बसेसला शहरात नो एंट्री संदर्भातील सूचना जाहिर केलेली आहे. मात्र त्याकडे वाहतूक पोलिस विभागाचा काणाडोळा होत असून केवळ वर्षपूर्तीचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी दुचाकी स्वारांना लक्ष्य केले जात असल्याने वाहनचालकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.कारवाई करण्यास हरकत नाही, परंतू केवळ दुचाकीस्वारच का ? असा सवाल व्यक्त होत असून ठिकठिकाणी ‘हेल्मेट’ सक्ती सह अन्य कागदपत्रांसाठी केवळ दुचाकी स्वारांच्या उलट-सुलट चौकशीचा फंडा सुरु असल्याचे निदर्शनास येत आहे. त्याउलट मात्र २८ जानेवारी २०१३ रोजी वाहतूक नियंत्रण विभाग ठाणे ने या भागातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी व नागरिकांच्या सोयीसाठी खासगी बसेसना शहरात प्रवेश बंदची सूचना काढली होती. डोंबिवली पूर्व भागातील घरडा सर्कल ते टिळक चौकादरम्यानच्या दोन्ही बाजूचा रस्ता, मानपाडा रोड, राथ रोड, फडके रोड, राजाजी पथ, पाटकर रोड, केळकर रोड, स्वामी विवेकानंद रोड, येथे कॉंक्रीटीकरण व सांडपाण्याची पाईपलाईन टाकण्याचे काम सुरु असल्याने हा निर्णय घेण्यात आला होता.त्यासाठी शहरात येणा-या सर्व प्रकारच्या टुरीस्ट बसेस, लक्झरी बसेस, खाजगी व कंपनीच्या बसेस यांना शहरातील प्रवासी घेणे-सोडणे यासाठी संपूर्ण वेळ प्रवेश बंदी राहील. तसेच त्या बसेसनी विकोनाका येथे थांबून त्यांचे प्रवासी घ्यावेत व सोडावे असेही त्यात नमूद केले आहे. जड वाहनांनादेखिल येथे प्रवेश बंदी असेल असे म्हंटले होते.नागरिकांच्या सुविधेसाठी शहरातील बाजारपेठेत माल ने-आण करण्यासाठी येणा-या मालवाहू वाहनांना दुपारी १ ते संध्या.४ या कालावधीत प्रवेश देण्यात येत आहे. यामध्ये स्कूल बस, एनएमएमटी बस, केडीएमटी बसेस आदींना मुभा असेल. तसेच ही सूचना पोलीस वाहने, फायरब्रिगेड, रुग्णवाहीका व अन्य अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू होणार नसल्याचे स्पष्ट केलेले होते. तिचे पालन मात्र झाले नाही.
उपायुक्तांची अधिसूचना धाब्यावर!
By admin | Updated: December 26, 2014 22:58 IST