मनोहर कुंभेजकर, मुंबईकुमारवयीन मुलींच्या आरोग्यासाठी राष्ट्रीय महिला आयोगाने केलेल्या शिफारशींना महाराष्ट्रात धाब्यावर बसवण्यात आले आहे. शासकीय तसेच खासगी महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशिन्स बसवण्याची सूचना शैक्षणिक संस्थाचालक आणि राज्य सरकारने गांभीर्याने न घेतल्याचे चित्र आहे. राज्यातील सुमारे अडीच हजार तंत्रशिक्षण महाविद्यालयांपैकी केवळ दोनच महाविद्यालयांमध्ये सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशिन्स बसवण्यात आल्या आहेत. तंत्रशिक्षण संचालनालयाकडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते नीलेश भोसले यांना माहितीच्या अधिकारात उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, भुसावळमधील श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालय व वसईमधील विद्यावर्धिनी महाविद्यालय या दोन महाविद्यालयांचा अपवाद वगळता कोणत्याही महाविद्यालयाने सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशिन बसवलेले नाही.मासिक पाळीत होणारा रक्तस्राव आणि पोटदुखीच्या त्रासाला कंटाळून अंबरनाथमधील २० वर्षीय तरुणीने आत्महत्या केली. या घटनेमुळे महिलांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पौगंडावस्थेतील मुलींमध्ये मासिक पाळीबाबतची जागरूकता निर्माण करण्यासह महाविद्यालयांमध्ये सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध करून देण्याकडे सरकार दुर्लक्ष करत आहे, ही खेदजनक बाब आहे. महत्त्वाचे म्हणजे याबाबत बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान ही राज्ये पुढे असतील तर मग महाराष्ट्र मागे का?- शालिनी ठाकरे, सरचिटणीस, मनसे
सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशिनबाबत उदासीनता
By admin | Updated: February 6, 2016 03:26 IST