Join us
Daily Top 2Weekly Top 5

दक्षिण मुंबईत बारा उमेदवारांचे डिपॉझिट जप्त

By संतोष आंधळे | Updated: June 6, 2024 20:40 IST

तीन लाख रुपये शासनाच्या तिजोरीत जमा

लोकसभा न्यूज नेटवर्क, मुंबई : लोकसभा निवडणुकीत अनेकवेळा मुख्य प्रवाहातील पक्षांचे उमेदवार उभे राहतात त्यांचीच चर्चा होत असते. मात्र निवडणुकीत त्याच्या व्यतिरिक्त अनेक जण अपक्ष उमेदवार म्हणून आपला अर्ज भरून निवडणुकीच्या रिंगणात उभे असतात. त्यांना सुद्धा काही प्रमाणात मते पडत असतात. मात्र काही विशिष्ट प्रमाणात या उमेदवारांना मते मिळाली नाही तर निवडणूक आयोगाकडे अनामत ( डिपॉजिट ) म्हणून जी रक्कम जमा केलेली असते ती जप्त केली जाते.  मुंबई दक्षिण या लोकसभा मतदार संघातून यावेळी १४ उमेदवारांनी अर्ज  भरले होते. त्यापैकी बारा उमेदवारांचे डिपॉजिट जप्त करण्यात आले आहे. त्यामुळे प्रत्येकी उमेदवारांकडून २५ हजार रुपयांप्रमाणे तीन लाख रुपये शासनाच्या तिजोरीत जमा करण्यात आले आहे.  

मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघातून उद्धव सेनेचे उमेदवार अरविंद सावंत आणि शिंदे सेनेच्या उमेदवार यामिनी जाधव यांचा पराभव झाला. या दोन उमेदवारांव्यतिरिक्त अन्य सर्व उमेदवाराचे डिपॉजिट जप्त करण्यात आले आहे.

केव्हा होते डिपॉजिट जप्त

लोकसभा निवडणुकीत उमेदवार म्हणून उभे राहताना २५ हजार रुपये अनामत रक्कम म्हणून भरावे लागतात. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार एकूण वैध मतांच्या एक सांष्टांश मते उमेदवारांना मिळणे अपेक्षित असते. ज्या उमेदवारांना ती मते मिळत नाही अशा उमेदवाराची अनामत रक्कम जप्त होते.मुंबई दक्षिण मतदार संघात एकूण वैध मते ७,५९,७०२ इतकी होते. त्यापैकी एक सांष्टांश मते १,२६,६१७ इतकी आहेत.  ज्या बारा उमेदवारांची अनामत रक्कम जप्त केली आहे त्यांच्यापैकी सर्वाधिक मते वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अफजल शब्बीर अली दाऊदानी यांना ५६१२ मते मिळाली आहेत.  कुणालाही एक सांष्टांश मते मिळाली नाहीत. 

टॅग्स :मुंबई