परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांची माहिती
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने आणि अपघात कमी करण्याच्या दृष्टीने अवजड वाहनांचे लेन कटिंग हा गंभीर मुद्दा बनला आहे. त्यामुळे अवजड वाहनांकडून होणाऱ्या लेन कटिंगविरोधात परिवहन विभाग जनजागृती करणार आहे, असे परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी सांगितले.
परिवहन विभाग १८ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत अवजड वाहनांच्या लेन कटिंग विरोधात मोहीम राबवणार आहे. तसेच प्रवासी वाहतुकीसह आता रस्त्यांवरील अवजड वाहनांनासुद्धा व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीम (व्हिटीएस) लावण्याचा प्रयत्न राज्य परिवहन विभागाचा आहे. त्यासाठी परिवहन विभागाने कंट्रोल सेंटर निर्माण करण्यासाठी एक प्रस्ताव तयार केला असल्याची माहिती अविनाश ढाकणे यांनी दिली आहे.
तसेच आरटीओ कार्यालयात दाखल करण्यात येत असलेले वैद्यकीय प्रमाणपत्र कितपत खरे आहे. ही तपासण्याची यंत्रणा आरटीओमध्ये नाही. त्यामुळे अनेक वेळा बनावट प्रमाणपत्र सादर केले जात असल्याने, चालकांची योग्य वैद्यकीय तपासणी होत नाही. परिणामी अपघातात वाढ होते. त्यामुळे एनआयसीच्या माध्यमातून निवडक डॉक्टरांच्या साहाय्याने वैद्यकीय प्रमाणपत्र ऑनलाइन पद्धतीनेच सादर करण्याची यंत्रणा उभारण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.