Join us
Daily Top 2Weekly Top 5

देवरांच्या टीकेने काँग्रेसमध्ये चर्चेचे मोहोळ

By admin | Updated: May 23, 2014 02:37 IST

लोकसभा निवडणुकीतील पानिपतानंतर टीम राहुलला उघड उघड विरोध होत असून मुंबईचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी बुधवारी एका मुलाखतीत टीम राहुलवर टीकास्त्र सोडले आहे.

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीतील पानिपतानंतर टीम राहुलला उघड उघड विरोध होत असून मुंबईचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी बुधवारी एका मुलाखतीत टीम राहुलवर टीकास्त्र सोडले आहे. विशेष म्हणजे, काँग्रेसच्या एका गटाने त्यांच्या सुरात सूर मिसळला आहे. प्रत्यक्ष जनतेत जाऊन काम करण्याचा अनुभव असलेल्यांना नेतृत्वाची पदे दिली जावी, अशी मागणी करतानाच या नेत्यांनी काँग्रेसला कठोर आत्मपरीक्षणाचा सल्ला दिला आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा म्हणाले की, राहुल गांधी यांच्या सल्लागारांना तळागाळातील वस्तुस्थितीची माहिती नसून निवडणुकीचाही अनुभव नाही. पक्षाप्रती गाढ निष्ठा आणि जुळलेल्या भावनांमुळेच मी निवडणुकीतील पराजयाबद्दल हे शल्य व्यक्त करीत आहे. या विधानावर अनेकांनी भुवया उंचावल्या असताना देवरा यांनी गुरुवारी टिष्ट्वटरवर प्रतिक्रिया देताना पक्षावरील अतीव निष्ठेतूनच ही भावना व्यक्त केल्याचा खुलासा केला आहे. पक्षाला पुन्हा नव्या दमाने उभे राहता यावे या प्रामाणिक इच्छेपोटी मी हे विधान केले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. देवरा यांचे विधान काँग्रेसमध्ये परस्परांवर खापर फोडण्याचा खेळ असल्याचे मानले जाते. पक्षात नेतृत्वाची पदे देताना तळागाळातील प्रत्यक्ष कामाचा अनुभव आणि वस्तुस्थितीचा जाण हा आधार मानला जावा, असे अन्य एक ज्येष्ठ नेते सत्यव्रत चतुर्वेदी यांनी म्हटले. देवरा यांनी केलेले विधान पूर्णपणे बरोबर नसेलही मात्र त्यातील बहुतांश भाग अचूक आहे, असे सांगत त्यांनी देवरा यांच्या विधानाचे समर्थन केले. (वृत्तसंस्था)