Join us

महापालिका हद्दीत धुळीच्या प्रमाणात घट

By admin | Updated: July 18, 2014 00:09 IST

हरात झालेली रस्त्यांची कामे, काहीशी मोकळी झालेली वाहतूककोंडी, यामुळे शहरातील धुळीच्या प्रमाणात मागील वर्षीच्या तुलनेत घट

ठाणे : शहरात झालेली रस्त्यांची कामे, काहीशी मोकळी झालेली वाहतूककोंडी, यामुळे शहरातील धुळीच्या प्रमाणात मागील वर्षीच्या तुलनेत घट झाल्याची माहिती महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या पर्यावरण अहवालातून पुढे आली आहे. पालिकेच्या वतीने शहरातील ११ महत्त्वाचे चौक आणि नाक्यांवर हा सर्व्हे केला होता. यातून ही माहिती समोर आली आहे. आनंदनगर नाक्यावर केलेल्या सर्व्हेत येथील धुळीचे प्रमाण मागील वर्षीच्या तुलनेत घटले असल्याचे या अहवालात म्हटले आहे. येथे खूप रहदारी असल्याने येथे धुळीचे प्रमाण हे मर्यादेपेक्षा अधिक असले तरी मागील वर्षीच्या तुलनेत कमी असल्याचे महापालिकेने म्हटले आहे. मागील वर्षी येथे धुळीचे प्रमाण ४५६ (तरंगते धुलीकण) एवढे होते. ते यंदा ३४४ एवढे आहे. तर मुलुंड नाका येथेसुद्धा वाहतूककोंडी असल्याने येथे धुळीचे प्रमाण हे मर्यादेपेक्षा अधिक असले तरी ते मागील वर्षीच्या तुलनेत कमी आहे. बाळकुम नाका येथे रस्ता रुंदीकरणाचे काम झाल्याने येथे धुळीच्या प्रमाणात चांगलीच घट झाली आहे. नितीन कंपनी भागात आरओबीचे काम पूर्ण झाल्याने येथील वाहतूककोंडी कमी होऊन येथील प्रमाणसुद्धा घटले आहे. गावदेवी भागातसुद्धा सॅटीसचे काम पूर्ण झाल्याने येथील प्रमाणात घट झाली आहे. तीनहात नाका भागात मात्र ट्रॅफिक वाढली असली तरी धुलीकणांमध्ये येथे वाढ झाल्याचे दिसून आले आहे. भारत गिअर भागात वाहतुकीत सुसूत्रता आल्याने येथील धुळीच्या प्रमाणात घट झाली आहे. कळवा पि.स., कळवा नाका, विटावा नाका आणि कॅसल मिल भागांतसुद्धा धुळीच्या प्रमाणात घट झाल्याचे आढळून आले आहे.