Join us

खांदा वसाहतीत आढळला डेंग्यूचा रुग्ण

By admin | Updated: July 14, 2014 22:58 IST

पावसाला सुरुवात झाल्यामुळे खोकला, ताप, सर्दीसारख्या व्याधी सुरु झाल्या आहेत. त्याचबरोबर मलेरिया आणि डेंग्यूची लागणही होऊ लागली आहे

कळंबोली : पावसाला सुरुवात झाल्यामुळे खोकला, ताप, सर्दीसारख्या व्याधी सुरु झाल्या आहेत. त्याचबरोबर मलेरिया आणि डेंग्यूची लागणही होऊ लागली आहे. खांदा वसाहतीत डेंग्यूचा एक रुग्ण आढळला असल्याने वसाहतीत भीतीचे वातावरण पसरले आहे. साथीचे आजार होऊ नये, याकरिता सिडकोकडून कोणत्याही उपाययोजना होताना दिसत नाहीत. प्रसाद नारायण गुडरे (१८) युवकाला लागण झाली असून तो सेक्टर-८ मधील ए ४ या सिडको वसाहतीत राहतो. त्याला अचानक उलट्या होऊन ताप आल्याने अष्टविनायक रुग्णालयात नेण्यात आले. प्रकृती खालावल्याने प्रसादला कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या सर्व वैद्यकीय चाचण्या केल्यानंतर डेंग्यू डिटेक्ट झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. संबंधित रुग्णांच्या रक्तपेशी दीड लाखांहून २१००० हजारांवर पोहचल्या आहेत. सिडकोकडून नियमित कचरा उचलला जात नाही. त्याचबरोबर औषध फवारणीही होत नसल्याचे माजी नगरसेवक शिवाजी थोरवे यांनी सांगितले. त्याचबरोबर पावसाळा सुरु झाला तरी साथीच्या आजार होऊ नये याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजना झाल्या नसल्याचे थोरवे यांचे म्हणणे आहे. (वार्ताहर)