मुंबई : ‘स्वच्छता राखा, पाणी साचू देऊ नका’ असे आवाहन मुंबई महापालिका मुंबईकरांना सातत्याने करीत आहे. साथीचे आजार टाळण्यासाठी मुंबईकरांचा सक्रिय सहभाग हवा. मात्र, घर आणि आजूबाजूच्या परिसरात स्वच्छता राखण्याच्या आवाहनाकडे इमारतींत आणि उच्चभ्रू वस्त्यांमध्ये राहणारे दुर्लक्ष करीत असून त्यामुळे ही ठिकाणे मुंबईत ‘डेंग्यूचे अड्डे’ बनल्याचे स्पष्ट झाले आहे. महापालिकेने जानेवारी ते आॅगस्टदरम्यान केलेल्या सर्वेक्षणात इमारतींच्या परिसरात ७ हजार ११८ डेंग्यूच्या डासांची उत्पत्तीस्थाने आढळून आल्याचे स्पष्ट झाले आहे.मुंबईत गेल्या काही वर्षांपासून मलेरिया आणि डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्याला आळा घालण्यासाठी महापालिका विविध उपक्रम राबवते. त्याचाच भाग म्हणून, महापालिकेच्या कीटकनाशक विभागाचे अधिकारी शहरातील विविध ठिकाणी जाऊन उत्पत्तीस्थानांचा शोध घेतात. गेल्या आठ महिन्यांमध्ये ७४ लाख ७८ हजार ५५६ घरांची तपासणी करण्यात आली. त्यात डासांची मुंबईत ८ हजार ९४६ उत्पत्तीस्थाने दिसून आली. त्यात झोपडपट्टी परिसरात ‘एडिस एजिप्ती’ डासांची १ हजार ८२८ उत्पत्तीस्थाने आढळून आली आहेत. तर इमारतींच्या परिसरात ७ हजार ११८ उत्पत्तीस्थाने आढळून आली आहेत. झोपडपट्टीच्या तुलनेत इमारतींच्या परिसरात तब्बल चार पटीने अधिक उत्पत्तीस्थाने आढळून आल्याची माहिती महापालिकेचे कीटक नियंत्रण अधिकारी राजन नारिंग्रेकर यांनी दिली. आठ महिन्यांत केलेल्या तपासणीत आवश्यकतेनुसार काही घरांना एकापेक्षा अधिक वेळा भेटी देण्यात आल्या आहेत. त्याशिवाय ८० लाख २० हजार कंटेनर्सची तपासणी करण्यात आली आहे. आतापर्यंत महापालिकेद्वारे १३ हजार ५९३ नोटिसा देण्यात आल्या आहेत. तर ९२७ प्रकरणांत कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. याच आठ महिन्यांच्या कालावधीत २६ लाख ९२ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)>अधिकाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन सार्वजनिक ठिकाणांपेक्षा घरात आणि घराच्या आजूबाजूच्या परिसरात पाणी साचून राहिल्याने डेंग्यूच्या डासांची उत्पत्तीस्थाने निर्माण होण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे घरी डेंग्यू आणि मलेरियाविषयक तपासणीसाठी महापालिकेची पथके जातात. या पथकांना मदत करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.>कुठे होते डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती?डेंग्यूच्या विषाणूंचा प्रसार करणारे डास साचलेल्या किंवा साठवलेल्या स्वच्छ पाण्यातच प्रजोत्पादन करतात. तसेच या डासांच्या पाण्यातील अवस्था या आठ दिवसांच्या असतात. या दोन्ही बाबी लक्षात घेऊन आपल्या घरातील पिंप, बादल्या, पाणी साठविण्याची भांडी यातील पाणी आठवड्यातून किमान एक वेळा पूर्णपणे बदलावे. कोरडी केलेली भांडी कोरड्या कपड्याने दाब देऊन पुसून घ्यावीत. त्यामुळे भांड्यांच्या कडांना चिकटलेली डासांची अंडी नष्ट होतील. आठवड्यातून किमान एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळणेदेखील आवश्यक आहे. >गेल्या आठ महिन्यांमध्ये ७४ लाख ७८ हजार ५५६ घरांची तपासणी करण्यात आली. त्यात डासांची मुंबईत ८ हजार ९४६ उत्पत्तीस्थाने दिसून आली. झोपडपट्टी परिसरात ‘एडिस एजिप्ती’ डासांची १ हजार ८२८ उत्पत्तीस्थाने आढळून आली आहेत. तर इमारतींच्या परिसरात ७ हजार ११८ उत्पत्तीस्थाने आढळून आली आहेत.
डेंग्यूच्या डासांचे अड्डे इमारतींतच
By admin | Updated: September 18, 2016 01:16 IST