मुंबई : केईएम रुग्णालयात गेल्या दोन वर्षापासून सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामांमुळे रुग्णालयातील काही ठिकाणच्या पाइपलाइन फुटलेल्या आहेत. यामुळे वॉर्ड क्रमांक 1, 2, त्वचा विभागाच्या बाह्यरुग्ण विभागाच्या मागे पाणी साचते. केईएममधील 9 निवासी डॉक्टरांना डेंग्यूची लागण झाली असून, यापैकी 4 निवासी डॉक्टर हे बालरोगचिकित्सा विभागातील आहेत.
गुरुवारी दोन निवासी डॉक्टरांना डेंग्यू झाल्याचे निदान झाले होते. शनिवारी बालरोगचिकित्सा विभागातील निवासी डॉक्टर मनम मेहरा यांना डेंग्यूची लागण झाली आहे. याच्या बरोबरीनेच डॉ. नीलेश जाधव, डॉ. शशी यादव आणि डॉ. लमक यांनाही डेंग्यूची लागण झाली आहे. 9 डॉक्टरांपैकी 1 डॉक्टर खाजगी रुग्णालयामध्ये उपचार घेत होता. त्याला डिस्चार्ज दिला आहे. इतर निवासी डॉक्टरांवर अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू आहेत. सर्वाची प्रकृती स्थिर आहे.
केईएम रुग्णालयामध्ये 2 ठिकाणी डेंग्यूच्या डासांची पैदास होत असल्याचे आढळून आले होते. यानंतर रुग्णालय प्रशासनाने स्वच्छता मोहीम हाती घेतली होती. रुग्णालयाची स्वच्छता झाली असल्याचे प्रशासनाचे म्हणणो आहे. पण, रुग्णालय परिसरामध्ये अजूनही काही ठिकाणी पाणी साचलेले दिसत आहे. पाणी साठल्यामुळे डासांची पैदास होऊ शकते. यामुळे निवासी डॉक्टर, रुग्ण आणि रुग्णांचे नातेवाईक यांना डेंग्यू, मलेरियासारखे आजार होण्याचा धोका वाढला आहे. रुग्णालयातील कर्मचारी आणि डॉक्टरांना मलेरिया आणि डेंग्यूची लागण झाल्याचे समजते आहे. मात्र, निश्चित आकडा कळू शकलेला नाही. रुग्णालय प्रशासनाकडून याबाबत कोणतीही माहिती मिळत नाही. (प्रतिनिधी)