Join us  

सायन रेल्वे पुलाचे पाडकाम पुन्हा लांबणीवर; कारण गुलदस्त्यात, मुंबईकरांना तूर्त दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 9:47 AM

सायन येथील रेल्वे पूल पाडण्याचे काम आता अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले आहे.

मुंबई : सायन येथील रेल्वे पूल पाडण्याचे काम आता अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले आहे. त्यामुळे २८ मार्चपासून बंद करण्यात येणार हा पूलवाहतुकीसाठी खुला राहणार असल्याने मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे. दरम्यान, रेल्वेने या पुलाच्या पाडकामाची तारीख चौथ्यांदा पुढे ढकलली असून, याचे कारण मात्र गुलदस्त्यातच आहे.

मध्य रेल्वेच्या पाचव्या, सहाव्या मार्गिकांचे काम तसेच सायन पूल अत्यंत जुन्या झाल्याने तो पाडून त्या जागी नवा पूल बांधला जाणार आहे. मध्य रेल्वे आणि महापालिका एकत्र यासाठी काम करणार आहे. २० जानेवारी रोजी पुलाचे पाडकाम हाती घेतले जाणार होते. मात्र स्थानिक परिसरातून विरोध झाल्यानंतर काम पुढे ढकलण्यात आले. २८ फेब्रुवारी रोजी काम सुरू करण्यात येईल, असे ठरले असतानाच परीक्षांच्या हंगामात पाडकाम नको म्हणून पुन्हा २८ मार्च अशी नवी तारीख देण्यात आली. मात्र, आता पुन्हा २८ मार्च रोजी सुरू होणारे काम पुढे ढकलण्यात आले आहे. सायन पुलाचे बहुतांशी काम रेल्वेकडून केले जाणार आहे. रस्त्यालगतच्या भागाचे काम महापालिकेकडून केले जाणार आहे. 

पाडकाम पुढे ढकलण्याचे कारण रेल्वेकडून सांगितले जाईल, असे म्हणत महापालिकेने हात वर केले आहेत. सायन रेल्वे पुलाचे पाडकाम पुढे ढकलले आहे. अद्याप पुलाच्या पाडकामाची तारीख निश्चित केली नाही.- डॉ. स्वप्निल निला, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार, शाळा-महाविद्यालयांच्या परीक्षा, पुढील महिन्यात येणारे विविध सण यांचा विचार करून सायन पुलाच्या पाडकामाला तूर्तास स्थगिती देण्याच्या रेल्वे मंत्रालयाच्या निर्णयाचे स्वागत करतो - राहुल शेवाळे, खासदार, मुंबई दक्षिण-मध्य 

टॅग्स :मुंबईनगर पालिकामध्य रेल्वे