Join us  

२० लाखांची लाच मागणे दोन अभियंत्यांना भोवले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2024 11:57 AM

पालिकेच्या ‘सी’ वॉर्डमध्ये कार्यरत

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पोटमाळ्याच्या अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई रोखण्यासाठी जवळपास २० लाख रुपयांची मागणी करणाऱ्या पालिकेच्या सी वॉर्डमधील दोन लाचखोर अभियंत्यांसह तिघांना मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली. मंगेश कांबळी (वय ३७), सूरज पवार (वय ४३) आणि नीलेश होडार (वय ३७) अशी संशयित आरोपींची नावे आहेत.

कांबळी हा मरीन लाईन्स परिसरातील सी वॉर्डच्या इमारत व कारखाने विभागात कनिष्ठ अभियंता तर पवार हा दुय्यम अभियंता आहे. होडार हा समाजसेवक असल्याचा दावा करतो. या प्रकरणातील तक्रारदार यांच्या पार्टनरशिपमध्ये असलेल्या बिल्डिंगच्या पाचव्या मजल्यावरील पोटमाळ्याच्या अनधिकृत बांधकामावर निष्कासन कारवाईची नोटीस बजावण्यात आली होती. त्यानुसार फिर्यादी हे कांबळी आणि पवार यांना भेटायला गेले. तेव्हा या दोघांनी कारवाई न करण्यासाठी त्यांच्याकडे लाच म्हणून २० लाख रुपये मागितले. 

८ लाख घेताना अटक टेरेसवरील शेडसाठी १५ लाख तर उर्वरित ५ लाख हे पाचव्या मजल्याच्या अनधिकृत कामावर कारवाई न करण्यासाठी ते मागत होते.   तेव्हा या दोघांविरोधात फिर्यादी यांनी एसीबीकडे तक्रार केली. त्यांच्या तक्रारीनुसार ४ एप्रिल रोजी एसीबीच्या तपास अधिकाऱ्यांनी पडताळणी करत ५ एप्रिलला सापळा रचला.  कांबळी, पवार तसेच त्यांच्या वतीने लाचेचा पहिला हप्ता म्हणून ८ लाख रुपये स्वीकारणाऱ्या होडार याला अटक केली. याप्रकरणी एसीबीचे अधिकारी सध्या अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :लाच प्रकरणमुंबई