वाडा : डहाणू-कल्याण या नव्या रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण करावे, तसेच अंबाडी रोड ते वसई रोड या मार्गावर मेट्रो व मोनोरेल सुरू करावी, अशी मागणी ठाणे जिल्हा पॅसेंजर्स असोसिएशनचे अध्यक्ष ओमप्रकाश शर्मा यांनी बुधवारी खुपरी येथील पत्रकार परिषदेत केली. डहाणू-कल्याण मार्ग रेल्वे मंत्रालयाशी निगडित असून अंबाडी रोड-वसई रोड मेट्रो-मोनो रेल्वेचा विषय महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे.ठाणे व पालघर जिल्ह्यांच्या सर्वांगीण विकासासाठी या मागण्या वरदान ठरणाऱ्या असून त्यामुळे प्रामुख्याने ग्रामीण दुर्गम भागात तिसरी मुंबई वसविण्याचे श्रेय संबंधितांना मिळेल, असा आशावाद त्यांनी या वेळी व्यक्त केला.डहाणू-कल्याण हा रेल्वे मार्ग अंदाजे १२० किमी अंतराचा असून त्यामुळे पालघर जिल्ह्याचा ग्रामीण व दुर्गम भाग विकसित करण्याचे श्रेय रेल्वे मंत्रालयाला मिळणार आहे. या नव्या रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण करण्याचे आदेश रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी द्यावेत, अशी मागणी शर्मा यांनी पत्रकार परिषदेत केली. डहाणू-मायवाड, वाडा-अबिटघर-निळगाव, म्हसवळ, अंबाडी रोड, दुगाड, म्हापोली, पडघा, खडवली-कल्याण आदी भागांची लोकसंख्या २५ लाखांच्या घरात असून रेल्वेअभावी या भागाचा विकास खुंटला असल्याचे त्यांनी या वेळी निदर्शनास आणले. या भागात पडीक जमीन मोठ्या प्रमाणावर आहे. आजकाल भातशेती महत्त्वाची झाली आहे. उद्योगधंदे नसल्याने बेरोजगारी प्रचंड आहे. मुंबईपासून अवघ्या १५० किमी अंतराचा हा पट्टा अविकसित व मागास राहिला असून रेल्वे आल्यास या भागाचा सर्वांगीण विकास होईल. या भागात उद्योगधंदे व अन्य सोयीसुविधा येतील आणि या ग्रामीण व दुर्गम भागात तिसरी मुंबई वसविण्याचे श्रेय रेल्वेला मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी बोलताना व्यक्त केली. (वार्ताहर)
अंबाडी-वसई मेट्रो व मोनोरेल सुरू करण्याची मागणी
By admin | Updated: December 17, 2014 23:08 IST