Join us
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यांचे संरक्षण करण्याची मागणी

By admin | Updated: March 14, 2017 15:58 IST

विलेपार्ले आणि अंधेरी येथे असणा-या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे संरक्षण व्हावे, यासाठी छत्री बसवण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केलीय.

ऑनलाइन लोकमत/मनोहर कुंभेजकर

मुंबई, दि. 14 - पश्चिम दुर्तगती महामार्गावरील विलेपार्ले(पूर्व)येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि अंधेरी(पूर्व)मरोळ येथील शिवाजी महाराजांचे दोन्ही पुतळ्यांचे ऊन-पावसापासून संरक्षण व्हावे, यासाठी त्यावर छत्री बसवण्याची मागणी वॉच डॉग फाउंडेशनने केली आहे.   
 
छत्री बसवण्याची आणि पुतळ्याच्या खालील नियोजित रिकाम्या जागेत असलेल्या संग्रहालयासाठी भाजपा-शिवसेना युतीला मुहूर्त सापडलेला दिसत नाही, अशी उपरोधिक टीकाही केली जात आहे. शिवसेनेतर्फे शिवजयंती निमित्त सकाळी १० वाजता येथे जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येणार असून शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असा फतवा शिवसैनिकांना विभागप्रमुख आणि उपविभागप्रमुखानी सोशल मीडियावरून धाडण्यात आला आहे.  
 
पालिका निवडणुकीपूर्वी स्वबळाचे संकेत देताना विलेपार्ले येथील छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गेल्या 30 एप्रिल रोजी महाराष्ट्र दिनाच्या पूर्व संध्येला या पुतळ्याच्या परिसरात भाजपाने जोरदार सजावट व विद्युत रोषणाई केली होती. शिवसेनेतर्फे गेल्या वर्षी महाराष्ट्र दिनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेने याठिकाणी शक्तिप्रदर्शन केले होते.
 
या पुतळ्यावर जमा होणारी धूळ,  पक्षांची विष्ठा पडत आहे. विलेपार्ले(पूर्व)आणि अंधेरी(पूर्व)मरोळ येथील वेअरहाऊस येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळादेखिल छत्रीविना धूळखात आहे. त्यामुळे या दोन्ही पुतळ्याचे उन, पाऊस आणि निसर्गापासून संरक्षण होण्यासाठी या दोन्ही पुतळ्यावर छत्री असावी आणि रोज शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालण्यात, अशी मागणी वॉच डॉग फाउंडेशन या संस्थेचे ग्रॉडफे पिमेंटा आणि निकोलस अल्मेडा यांनी केली आहे.
 
शिवाजी पार्कवरील नव्या सेल्फी पॉइंटसाठी पुढाकार घेण्याची घोषणा केलेल्या सेना आणि भाजपाने मात्र महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या येथील शिवाजी महाराजांच्या दोन्ही पुतळ्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पश्चिम दुर्तगती महामार्गावरील सदर पुतळा हा छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळापासून सुमारे ३ किमी अंतरावर असल्यामुळे विमानतळासमोरील टी-२ टर्मिनलच्या ५ एकर जागेत लंडनच्या ट्राफलगर स्क्वेअर प्रमाणे उभारलेल्या नेल्सन यांच्या पुतळ्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचा १०० फूटी भव्य पुतळा उभारण्यात यावा अशी मागणी पिमेंटा आणि अल्मेडा  यांनी केली आहे.