Join us
Daily Top 2Weekly Top 5

संचालकांच्या चौकशीची मागणी

By admin | Updated: May 11, 2015 04:21 IST

राज्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाच्या प्रभारी संचालकांकडून औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्राचार्य, कर्मचाऱ्यांची छळवूक केली जात असल्याचा आरोप शिक्षक आमदारांनी केला आहे.

मुंबई : राज्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाच्या प्रभारी संचालकांकडून औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्राचार्य, कर्मचाऱ्यांची छळवूक केली जात असल्याचा आरोप शिक्षक आमदारांनी केला आहे. याबाबत अनेकांनी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाकडेही तक्रारी केल्या नंतरही सहायक संचालकांवर कारवाई होत नसल्याने राज्यातील आटीआय संस्थांमधील कर्मचाऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे त्यांची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी शिक्षक आमदार रामनाथ मोते यांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांकडे केली आहे.व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालयातील सहाय्यक संचालक आर.आर. आसावा यांनी केलेल्या नियमबाह्य कामांच्या अनेक तक्रारी संचालनालयाकडे आल्यानंतरही सरकारकडून त्यांना संरक्षण देण्यात येत असल्याचा आरोप मोते यांनी केला आहे. आसावा यांनी मुलुंड आयटीआयचे प्राचार्य पुरूषोत्तम वाघ यांच्या कामाची दखल न घेता त्यांच्याविरोधात अनेक खोट्या तक्रारी दाखल केल्या. याविरोधात वाघ यांनी न्यायालयात दाद मागितली. त्यावेळी आसावा यांनी त्यांच्याविरोधात केलेल्या तक्रारी खोट्या असल्याचे स्पष्ट झाले आहे. असाच प्रकार मालवण येथील प्राचार्यांच्या बाबतीत घडला आहे. या प्राचार्यांची जाणीवपूर्वक भिवंडी येथे बदली करण्यात आली. तसेच शिरपूर येथील प्राचार्यांनी केलेल्या कामाचा राष्ट्रीय स्तरावर गौरव झाला असतानाही त्यांच्या कामाची दखल न घेता त्यांचीही बदली परभणी येथे केल्याचे मोते यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.१३ व्या पंचवार्षिक योजनेचा अनुषेश भरून काढण्यासाठी सरकारने सुमारे दीड हजारांहून अधिक व्यवसाय अभ्यासक्रमांच्या तुकड्यांना मंजूरी दिली. परंतू आवासा यांच्या धोरणामुळे या तुकड्यांसाठी लागणारे आवश्यक यंत्रसामुग्री आणि कार्यवाही रखडली आहे. तसेच २०११पासून व्यवसाय अभ्यासक्रमांच्या दीड हजाराहून अधिक तुकड़यांना डीजीईटीकडून संलग्नताही मिळू शकली नसल्याकडेही मोते यांनी लक्ष वेधले आहे. (प्रतिनिधी)