आदर्श घोटाळा प्रकरण : दोन माजी मुख्यमंत्र्यांची दोन प्रकरणे न्यायालयात दाखलमुंबई : बहुचर्चित आदर्श सोसायटी इमारत घोटाळ्यात माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांनाही सीबीआयने आरोपी करावे, अशी मागणी करणारी फौजदारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली असून, येत्या ६ मे रोजी त्यावर सुनावणी होणार आहे.सामाजिक कार्यकर्ते प्रवीण वाटेगावकर यांनी ही याचिका केली आहे. महसूलमंत्री असताना निलंगेकर यांनी या सोसायटीला काही परवानग्या दिल्या होत्या. त्याबदल्यात त्यांचे जावई अरुण यांना येथे फ्लॅट मिळाला आहे. त्यामुळे निलंगेकर यांना या घोटाळ्यात आरोपी करावे, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. वाटेगावकर यांनी आपल्या याचिकेत आदर्श सोसायटीचे प्रवर्तक दिवंगत कन्हैयालाल गिडवाणी यांच्या रिमांडसाठी सीबीआयने विशेष न्यायालयात केलेल्या अर्जाचा आधार घेतला आहे. सीबीआयने त्या अर्जात म्हटले होते की, गिडवाणी यांनी इचलकरंजी येथील कल्लाप्पाण्णा आवाडे जनता सहकारी बँकेत दुसऱ्याच्या नावाने एक खाते उघडले व त्यात वेळोवेळी मोठ्या रकमा जमा करण्यात आल्या. यापैकी बरीच रक्कम नंतर त्यांची पत्नी, मुलगे व सुनांच्या नावांवर व त्यांचे मुलगे संचालक असलेल्या मे. जय महाराष्ट्र ट्रेडिंगमध्ये वर्ग करण्यात आली.वाटेगावकर यांच्या म्हणण्यानुसार, या रकमा नंतर आदर्शमध्ये बेनामी नावाने फ्लॅट्स घेण्यासाठी वापरण्यात आल्या. या जय महाराष्ट्रच्या खात्यातून निलंगेकर यांचे जावई ढवळे यांना किमान १७.६० लाख रुपये मिळाले. याआधी वाटेगावकर यांनी यासाठी विशेष सीबीआय न्यायालयातही अर्ज केला होता. न्यायालयाने तो फेटाळल्यानंतर त्यांनी ही याचिका केली. (प्रतिनिधी)