Join us  

मुंबई मेट्रोला दिल्लीची साथ! मेट्रो-६ मार्गिकेसाठी करार : निविदा मागविणार, कांजूरला डेपो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 2:45 AM

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने स्वामी समर्थनगर-जोगेश्वरी-विक्रोळी या मेट्रो-६ मार्गिकेच्या संपूर्ण अंमलबजावणीसाठी ठेवीच्या अटीनुसार दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनसोबत करार केला.

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने स्वामी समर्थनगर-जोगेश्वरी-विक्रोळी या मेट्रो-६ मार्गिकेच्या संपूर्ण अंमलबजावणीसाठी ठेवीच्या अटीनुसार दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनसोबत करार केला.विस्तृत प्रकल्प अहवालानुसार, १४.५ किलोमीटर लांबीच्या संपूर्ण मेट्रो-६ मार्गिकेची अंमलबजावणी दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनद्वारे करण्यात येईल. प्राधिकरणामार्फत ही मार्गिका दिल्लीद्वारे राबविण्यात येणार आहे. प्रकल्पाकरिता आवश्यक सिव्हिल वर्क व यंत्रणा खरेदी व सेवांकरिता निविदा दिल्लीद्वारे मागविण्यात येईल. ५ हजार ४९० कोटींच्या या प्रकल्पामध्ये १३ स्थानके असणार आहेत. स्वामी समर्थनगर (अंधेरी, लोखंडवाला), आदर्शनगर, मोमीननगर, जेव्हीएलआर, श्यामनगर, महाकाली गुंफा, सीप्झ व्हिलेज, साकी विहार रोड, राम बाग, पवई लेक, आयआयटी पवई, कांजूरमार्ग (प.), विक्रोळी-पूर्व द्रुतगती महामार्ग या स्थानकांचा यामध्ये समावेश आहे.मेट्रो मार्गाचा कारडेपो कांजूरमार्ग येथे उभारण्याचे नियोजित आहे. या प्रकल्पामुळे प्रवासाच्या कालावधीत ४५ मिनिटांची कपात होईल, अशी अपेक्षा आहे.लोखंडवाला, सीप्झ, आयआयटी-बी येथील परिसरांना जोडणी उपलब्ध होणार असून, २०२१ मध्ये दररोज ६.५ लाख प्रवासी या मार्गावरून प्रवास करतील, असा आशावाद एमएमआरडीएने व्यक्त केला आहे. करारावर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या परिवहन व दळणवळण विभागाच्या प्रमुख के. विजया लक्ष्मी आणिदिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या बिझनेस डेव्हलपमेंटचे संचालक एस.डी. शर्मा यांनी स्वाक्षरी केली असून, याप्रसंगी प्राधिकरणाचे अतिरिक्त महानगर आयुक्त प्रवीण दराडे उपस्थित होते.

टॅग्स :मेट्रोमुंबई