Join us

नागरी विकासकामांचा बोजवारा

By admin | Updated: May 31, 2014 01:17 IST

कल्याण-डोंबिवली मनपा क्षेत्रातील नियोजनशून्य सिमेंटच्या रस्त्यांसह जलनि:सारण व मलनि:सारण प्रकल्पांची कामे पूर्णत्वास न नेल्याने बहुतांश प्रभागातील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे

दिवाकर गोळपकर, कोळसेवाडी - कल्याण-डोंबिवली मनपा क्षेत्रातील नियोजनशून्य सिमेंटच्या रस्त्यांसह जलनि:सारण व मलनि:सारण प्रकल्पांची कामे पूर्णत्वास न नेल्याने बहुतांश प्रभागातील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. टक्केवारीच्या स्पर्धेत शहरातील सर्व नागरी विकासकामांचा बोजवारा उडाला आहे. लोकप्रतिनिधी, प्रशासन व ठेकेदारांच्या संगमनतामुळे करदात्यांना वेठीस धरले जात आहे. कल्याण (पूर्व) भागातील चाफेकर बंधू शिवाजी कॉलनी मार्ग रस्त्याची महिनाभरात मलशुद्धीकरण केंद्र (चिंचपाडा) ला जोडण्यात येणार्‍या भूमिगत पाइप टाकण्यासाठी ठेकेदाराने अक्षरश: चाळण करून टाकली आहे. एके ठिकाणी पाणीपुरवठा करणार्‍या जलवाहिन्याच ठेकेदाराने तोडून टाकल्याने अनेक दिवस रहिवाशांचे पाण्यासाठी हाल सुरू आहेत. प्लम्बर आणि ठेकेदाराच्या लहरीनुसार काम सुरू आहे. संपूर्ण रस्ताभर खोदलेले खड्डे भरून टाकताना काळजी न घेतल्यामुळे नागरिकांना चालणेही मुश्कील झाले आहे. पावसाळ्यापूर्वी या रस्त्याचे डांबरीकरण न झाल्यास नागरिकांचे हाल होणार आहेत. कार्यकारी अभियंता रवी जौरस व उपअभियंता किरण वाघमारे यांनी दिलेल्या माहितीनुसार कल्याण (पू) चिंचपाडा येथील मलशुद्धीकरण केंद्राला जोडण्याचे ८०० मीटर काम राहिले आहे. पावसाळ्यापूर्वी खोदलेल्या रस्त्याचे खडीकरण करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. आठ ते दहा दिवसांत मलशुद्धीकरण केंद्र (चिंचपाडा) ला जोडण्याचे काम होईल. (वार्ताहर)