Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ दाखल्यावरून वडिलांचे नाव हटवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 06:25 IST

अविवाहित मातेच्या साडेतीन वर्षांच्या मुलीच्या जन्मदाखल्यावर घालण्यात आलेले तिच्या वडिलांचे नाव हटवा, असा आदेश उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला मंगळवारी दिला.

मुंबई : अविवाहित मातेच्या साडेतीन वर्षांच्या मुलीच्या जन्मदाखल्यावर घालण्यात आलेले तिच्या वडिलांचे नाव हटवा, असा आदेश उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला मंगळवारी दिला. तसेच त्या मुलीचा जन्मदाखला कोणाला दिला असल्यास तो परत घ्या आणि वडिलांचे नाव नसलेला जन्मदाखला द्या, असेही निर्देश न्यायालयाने महापालिकेला दिले.एका २२ वर्षीय कुमारी मातेने तिच्या मुलीच्या जन्मदाखल्यावरून वडिलांचे नाव काढण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. रुग्णालयात चुकून कोणी तरी मुलीच्या जन्मदात्याचे नाव फॉर्ममध्ये भरले. तसेच माझा मुलीच्या जन्मदात्याशी विवाह झालेला नसतानाही फॉर्ममध्ये विवाहित असल्याची नोंदणी करण्यात आली आहे. त्यामुळे मूळ रजिस्टरमधूनच मुलीच्या जन्मदात्याचे नाव हटविण्यात यावे व माझा विवाह झाला नसल्याचे जाहीर करावे, अशी विनंती कुमारी मातेने न्यायालयाला केली.त्यावर न्या. अभय ओक व न्या. रियाझ छागला यांच्या खंडपीठाने मुलीच्या वडिलांचे नाव रजिस्टरमधून काढण्याचे आदेश व तिचा विवाह न झाल्याचे जाहीर करण्याचा अधिकार रिट न्यायालयाला नसल्याचे स्पष्ट केले. याचिकाकर्तीने दिवाणी न्यायालयात जावे, असे न्यायालयाने म्हटले. सोमवारच्या सुनावणीत मुलीच्या वडिलांनी न्यायालयात हजर राहून जन्मदाखल्यासह जन्माची नोंद असलेल्या रजिस्टरवरून त्यांचे नाव काढण्यास हरकत घेतली नाही.>नवा दाखला द्याउच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाने अशाच एका केसमध्ये दिलेल्या निकालाचा आधार घेत, महापालिकेला मुलीच्या जन्मदाखल्यावरून तिच्या जन्मदात्याचे नाव हटविण्याचे निर्देश दिले, तसेच मुलीचा जन्मदाखला अन्य कोणत्या संस्थेला दिला असल्यास, तो परत मागवा व वडिलांचे नाव नसलेला नवा जन्मदाखला द्या, असेही निर्देश पालिकेला दिले.