Join us

मुख्यमंत्र्यांना हरविण्यासाठी ‘महायुती’कडे पर्याय : तावडे

By admin | Updated: August 11, 2014 22:46 IST

पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक नेते संपर्कात

सातारा : ‘कऱ्हाड दक्षिणमधून महायुतीचा जो कोणी उमेदवार असेल, तो सक्षमच असणार आहे. येथून आम्ही मुख्यमंत्र्यांच्या विरोधात रणनीती आखली असून, त्यांना पराभूत करण्याचा पर्याय आमच्यासमोर तयार आहे,’ अशी घोषणा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी सातारा येथे केली. तावडे सोमवारी एका कार्यक्रमानिमित्त सातारा येथे आले होते. तत्पूर्वी त्यांनी सकाळी शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी बातचित केली. दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक नेते आमच्या संपर्कात असून, पुढील आठवड्यात भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणाही त्यांनी येथे केली.आगामी विधानसभा निवडणुकीत भ्रष्टाचार, शेतकरी आत्महत्या, टोल अन् एलबीटीमुक्त महाराष्ट्र, औद्योगिक विकास आणि ‘धोरण लकवा’ हे प्रमुख मुद्दे राहणार असल्याचे स्पष्ट करतच / पान ९ वरतावडे यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले. ते म्हणाले, ‘आगामी विधानसभा निवडणूक काँग्रेस मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढणार आहे. मात्र, त्यांचेच नेते ‘कऱ्हाड दक्षिण’मध्ये त्यांना विरोध करत आहेत. महाराष्ट्रातच नव्हे तर देशात यापूर्वी असा विरोध कोणत्याच मुख्यमंत्र्यांना झालेला नाही. त्यांच्या पक्षाचे नेते, कार्यकर्ते त्यांचे ऐकत नाहीत. त्यामुळे मान्यता नसलेल्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस विधानसभा कशी जिंकणार, असा प्रश्न आहे. मुख्यमंत्री फक्त तालुक्याचा विचार करतात. राज्य अथवा जिल्ह्याचा विचार करत असल्याचे त्यांच्या कृतीतून आणि निर्णयातून जाणवत नाही.’तावडे म्हणाले, ‘परिवहन खात्यात सर्वाधिक भ्रष्टाचार असूून, तेच खाते मुख्यमंत्र्यांकडे आहे. नगरविकास खात्याचे त्यांनी जे निर्णय घेतले ते अर्थपूर्ण आहेत.’पत्रकार परिषदेत माजी आमदार कांताताई नलवडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. भरत पाटील, जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र पवार, जिल्हा सरचिटणीस दत्ताजी थोरात, शहराध्यक्ष सुवर्णा पाटील, शिवाजी जाधव आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)लवकरच जागा वाटपाची चर्चा...महायुतीमध्ये जागा वाटपाच्या अनुषंगाने वाद निर्माण झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून देताच त्यांनी त्याचा इन्कार केला. ते म्हणाले, ‘सर्वप्रथम शिवसेना-भाजप आणि यानंतर महायुतीतील सर्व घटक पक्षांची बैठक झाली. पुण्यामध्येही चर्चा झाली आहे. आमची जागा वाटपाची चर्चा थोड्याच दिवसांत होणार आहे. नेतेपदाबाबत कोणताही वाद नसून याबाबतचा निर्णय सर्वानुमते घेतला जाईल. महायुती म्हणजे एक कुटुंब असून, येथे नेतेपदाबाबत कोणताही वाद नाही.