Join us
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळी पहाट उत्साहात

By admin | Updated: November 11, 2015 01:04 IST

श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासातर्फे आयोजित ‘दीप:ज्योति नमोस्तुते’ हा दिवाळी पहाट कार्यक्रम मंगळवारी रंगला. ज्येष्ठ गायिका पद्मजा फेणाणी-जोगळेकर,

मुंबई : श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासातर्फे आयोजित ‘दीप:ज्योति नमोस्तुते’ हा दिवाळी पहाट कार्यक्रम मंगळवारी रंगला. ज्येष्ठ गायिका पद्मजा फेणाणी-जोगळेकर, वैशाली सामंत, स्वप्निल बांदोडकर, कविता पौडवाल, मंगेश बोरगावकर यांचे सुरेल व मंत्रमुग्ध गायन, तर योगिता चितळे यांनी नृत्यावर गायलेल्या बहारदार लावण्या तसेच भाऊ कदम व कुशल बद्रिके यांचा विनोदाचा तडका अशा आतषबाजीने सजलेला या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.प्रभादेवीच्या रवींद्र नाट्य मंदिरात प्रतिभावंत कलावंतांच्या सहभागाने व रसिकांच्या साक्षीने पार पडलेल्या ‘दिवाळी पहाट : २०१५’ला उदंड प्रतिसाद मिळाला. अभिजित खांडकेकर, मानसी कुलकर्णी यांनी खुमासदार शैलीत सूत्रसंचालन करून प्रेक्षकांची दिलखुलास दाद मिळवली. तर मानसी नाईक, प्रथमेश परब, मिताली मयेकर, हेमांगी कवी यांनी नृत्ये सादर केली. नंदेश उमप व सिद्धेश पै यांनी भारूड व वीररसाने भरलेला पोवाडा सादर करून, आदित्य ओक यांनी पेटीवादन करून रसिकांची मने जिंकली.या सांस्कृतिक कार्यक्रमादरम्यान न्यासातर्फे दरवर्षी वैद्यकीय, सामाजिक, महिला, वाङ्मय, क्रीडा व पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना सन्मानित करण्यात आले. त्यात अनुक्रमे, डॉ. स्मिता कोल्हे व डॉ. रवींद्र कोल्हे, जीवनधारा फाउंडेशन माझगावचे संस्थापक जेने डिसिल्वा, हंसाजी जयदेवा योगेंद्र, डॉ. महेश केळुसकर, काजल खोत, राही भिडे यांचा समावेश आहे. तसेच याप्रसंगी विक्रांत साखळकर यांना प्रोत्साहनपर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या वेळी न्यासाचे नरेंद्र राणे, कोषाध्यक्षा निर्मला सामंत-प्रभावळकर, सदस्य प्रवीण नाईक, नितीन कदम, सतीश पाडावे, मोहन म्हामुणकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)