ऑनलाइन टीम
मुंबई, दि. १३ - राष्ट्रवादीचे बंदखोर आमदार दीपक केसरकर यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली असून आपण लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. मुंबईतील पत्रकार परिषदेदरम्यान ते बोलत होते. येत्या ८ दिवसांत आपण आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी नारायण राणेंविरोधात लढत राहणार असल्याचेही स्पष्ट केले. आपल्या तत्वांशी, स्वाभिमानाशी तडजोड करणे अशक्य असल्याने सिंधुदुर्गातील गुन्हेगारी प्रवृत्तींशी लढण्यासाठी आपण राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत असल्याचे त्यांनी सांगितले.
दीपक केसरकर हे नारायण राणे यांचे विरोधक म्हणून ओळखले जातात. लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी निलेश राणेंचा प्रचार करण्यास नकार दिला होता. तसेच त्यांच्याविरोधात प्रचार करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली होती. काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवत असताना आणि नीलेश राणेंना राष्ट्रवादीने पाठिंबा जाहीर केलेला असतानाही केसरकरांनी राणेंविरोधात भूमिका घेतल्याने राष्ट्रवादीने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती. या सर्व प्रकारामुळे केसरकर व त्यांचे समर्थक नाराज झाले होते.