Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई पोलिसांच्या तंबाखू सेवनात घट

By admin | Updated: May 28, 2017 02:42 IST

‘कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन’ (सीपीएए)ने हाती घेतलेल्या उपक्रमाचा भाग म्हणून, २०१७च्या आतापर्यंतच्या कालावधीमध्ये मुंबई पोलिसांमधील तंबाखू खाण्याचे प्रमाण

- लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : ‘कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन’ (सीपीएए)ने हाती घेतलेल्या उपक्रमाचा भाग म्हणून, २०१७च्या आतापर्यंतच्या कालावधीमध्ये मुंबई पोलिसांमधील तंबाखू खाण्याचे प्रमाण फार मोठ्या प्रमाणावर घटले असून, ते ७० टक्क्यांवरून तब्बल ३५ टक्के एवढे खाली आले आहे. ‘सीपीएए’ने २०१५ मध्ये जागतिक तंबाखूरहित दिनाचे औचित्य साधून, ‘तंबाखूरहित मुंबई पोलीस स्टेशन’ ही मोहीम सुरू केली होती. सीपीएएने केवळ दोन वर्षांत केलेल्या समुपदेशनामुळे मुंबई पोलिसांचे तंबाखू सेवन कमी झाले आहे.सीपीएएच्या परीक्षणात असे आढळले आहे की, युवा पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये तंबाखूचे व्यसन जास्त प्रमाणात आहे. कारण हे कर्मचारी खेडेगावातून आले असून, त्यांच्यात लहानपणापासून हे व्यसन सुरू होत असल्याने ते त्याला बळी पडत आहेत. सीपीएएच्या परीक्षणात ३००० पोलिसांमध्ये ७० टक्के तंबाखूचे व्यसन आढळले होते, ज्यात ३५ टक्के पोलिसांना कर्करोगाचे लक्षण सुरू झालेले दिसले होते. सीपीएएने ही मोहीम २०१५ मध्ये सुरू केली होती, ज्यात पहिल्या वर्षीच तंबाखूचे व्यसन ७० टक्क्यांहून कमी होऊन ४५ टक्के व या वर्षी ते आणखी कमी होऊन ३५ टक्के इतके झालेले आढळले आहे. या प्रयत्नात माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी पुढाकार घेतला होता.सीपीएएच्या कार्यकारी संचालिका अनिता पीटर यांनी सांगितले की, हा प्रयत्न आणखी एक-दोन वर्षे सुरू ठेवला, तर हे प्रमाण शून्यावर येण्याची शक्यता आहे. सीपीएएने तंबाखूविरोधी मोहीम शहरातील बऱ्याच पोलीस स्टेशनमध्ये राबविली होती. या मोहिमेंतर्गत पोलिसांना तंबाखू, गुटखा मसाला, सिगारेट, विडी आदींच्या सेवनामुळे शरीराच्या होणाऱ्या नुकसानाबद्दल माहिती देण्यात आली होती. त्याचबरोबर, कर्मचाऱ्यांची मुख तपासणीसुद्धा करण्यात आली होती. तंबाखू सेवनाने प्राथमिक होणारे दुष्परिणाम आढळल्यास, त्यावर डॉक्टरांचा सल्ला ताबडतोब घेण्यास सुचविण्यात आले होते. पीटर पुढे म्हणाल्या की, बऱ्याच कर्मचाऱ्यांनी तंबाखूचे व्यसन सोडण्याची तयारी दाखविली होती, पण त्यांचा सेवेचा जास्त कालावधी, कामाचे ओझे, मानसिक तणाव या कारणांमुळे त्यांना ते शक्य होत नव्हते. या मोहिमेचा भाग म्हणून मरिन ड्राइव्ह, माता रमाबाई मार्ग, रफी अहमद किडवाई मार्ग, सायन, माटुंगा, वरळी, धारावी, मलबार हिल, नागपाडा, भायखळा जेल आणि माहिम या पोलीस ठाण्यांमधून १५०० पोलिसांची तपासणी केली आहे. निरंतर समुपदेशनाबरोबरच तंबाखू सोडणे आणि तणाव व्यवस्थापन या बाबींवर विशेष कार्यक्रम राबविले गेले आहेत.