Join us

एमबीएच्या एमएचटी-सीईटीच्या अर्जात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 03:38 IST

एमसीएच्या अर्जात झाली वाढ; ४ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी केली नोंदणी

मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी एमबीए आणि एमसीए अभ्यासक्रमांच्या एमएचटी-सीईटी परीक्षेसाठी अर्ज नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाली असून, मागील वर्षीपेक्षा यंदा नोंदणी झालेल्या अर्जात घट दिसून आली आहे.मागील वर्षी एमबीए आणि एमसीए-सीईटी परीक्षेसाठी एकूण ४ लाख १३ हजार २८३ अर्जांची नोंदणी झाली होती. मात्र, यंदा अर्ज नोंदणीला मुदतवाढ मिळूनही ४ लाख ५ हजार ३७५ अर्जांची नोंदणी झाली आहे. एमबीएसाठी नोंदणी झालेल्या अर्जांची संख्या १ लाख २४ हजार २३६ आहे, तर एमसीएसाठी नोंदणी झालेल्या अर्जांची संख्या १८ हजार ५१३ इतकी आहे.१० जानेवारीपासून सुरू झालेल्या एमबीए/एमएमएस सीईटी नोंदणीला सीईटी सेलकडून मुदतवाढ मिळाली आहे. या परीक्षांसाठी आॅनलाइन अर्ज मागविण्याची मुदत १५ फेब्रुवारीपर्यंत होती. उमेदवार आणि त्यांच्या पालकांनी मुदत वाढविण्यासाठी विनंती केल्याने, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन या अभ्यासक्रमांचे आॅनलाइन अर्ज भरण्याची मुदत २२ फेब्रुवारी, २०२० पर्यंत वाढविण्यात आली होती. मागील वर्षी एमबीएसाठी १ लाख ११ हजार ८४६, तर एमसीएसाठी १४, १६६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यामुळे एकूण अर्जांपैकी एमबीएच्या अर्जात घट तर एमसीएच्या अर्जात यंदा वाढ झाली.बोगस प्रवेशाच्या चौकशीमुळे कमी अर्जांची शक्यताराज्यातील एमबीए अभ्यासक्रमाचे प्रवेश सीईटी सेलच्या माध्यमातून होतात. या अभ्यासक्रमांना प्रवेश देताना अखिल भारतीय कोट्यातील प्रवेशही राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांच्या माध्यमातून केले जातात. हे प्रवेश देताना विविध कॅट, सीमॅट यांसह विविध खासगी संस्थाच्या माध्यमातून घेतलेल्या परीक्षांच्या आधारे प्रवेश दिले जातात. मागील वर्षी जुलै-आॅगस्टमध्ये झालेल्या प्रवेश प्रक्रियेच्या वेळी अनेक विद्यार्थ्यांनी ९९ पर्सेंटाईल असलेली खोटी गुणपत्रके सादर करून, प्रवेश घेतल्याची तक्रार प्रवेश नियमन प्राधिकरणाकडे विद्यार्थी आणि संस्थांनी केली. तपासणीअंती विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी खोटी कागदपत्रे सादर केल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर, प्राधिकरणाने खासगी संस्थांच्या परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांची पडताळणी सुरू केली. यावेळी सीईटी सेलच्या प्रवेश नियंत्रण समितीने एमबीए किंवा एमएमएस प्रवेश घेताना बनावट गुणपत्रिका देणाऱ्यांचे प्रवेश रद्द केले. यामुळे यंदा एमबीए सीईटीसाठी कमी अर्जांची नोंदणी झाल्याची शक्यता शिक्षणतज्ज्ञांकडून वर्तविण्यात येत आहे.